पंकजा मुंडे यांच्या मदतीला सुप्रिया सुळे सरसावल्या, भाजपला केला परखड सवाल, ती लेक नाही का?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारवाई करत 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केलीय. या कारवाईनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय.
पुणे : 25 सप्टेंबर 2023 | भाजपच्या एका दिल्लीतील खासदाराचे घर जीएसटी आणि टॅक्स प्रॉब्लेममध्ये आलं होतं. मात्र, भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा अदृश्य हाताने त्यांच्या घराचा लिलाव कसा थांबवला? एकीकडे बेटी पढाव आणि बेटी बचाव म्हणणारी ही लोक आहेत. मग, पंकजा मुंडे ही भारतीय जनता पार्टीची लेक नाही का ? असा जळजळीत सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला केलाय. कोणतंही राजकारण न करता या राज्यातील आणि देशातील कुठल्याही लेकीवर अन्याय होत असेल तर मी तिच्या बाजूने खंबीरपणे उभी राहील, असेही त्या म्हणाल्यात
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारवाई केली. पंकजा मुंडे यांनी केंद्रातील नेत्यांनी इतर कारखान्यांना मदत केली. पण, मला मदत केली नाही असा आरोप केलाय. त्याच्या या आरोपानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाजपवर हल्लाबोल केलाय.
पंकजा मुंडे यांच्या वडिलांनी गोपीनाथ मुंडे यांनी हयात असताना जेवढं भारतीय जनता पक्षाचे केलंय तेवढे करणारे महाराष्ट्रात नेते कमी असतील असा टोला त्यांनी लगावला. सत्तेत नसताना पक्षाला सत्तेत असण्यासाठी मुंडे यांनी केवढे कष्ट केले. आज त्यांची मुलगी लढतेय. पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे आज हयात नाहीत म्हणून त्यांच्या लेकीशी तुम्ही कसेही वागाल? हा अन्याय आहे अशी तिंक त्यांनी भाजपवर केली.
मुंडे साहेबांच्या लेकीवर अन्याय करण्याचे पाप भाजपा करतेय. राज्यातील आणि देशातील कुठल्याही लेकीवर अन्याय होत असेल तर मी तिच्या बाजूने खंबीरपणे उभी असेन. भारतीय जनता पक्षात आहे त्या मुलीवर अन्याय करण्याचे पाप भारतीय जनता पक्ष करतोय याचा मी जाहीर निषेध करते. पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीची लेख नाही का? असा जळजळीत सवालही खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला केला.