हत्येला जबाबदार असणाऱ्यांना निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न…तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सुप्रिया सुळेंचा आरोप
पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केले होते आणि आज जे वक्तव्य केले आहे त्यात खूप फरक आहे. एका हत्येला जबाबदार असणाऱ्या लोकांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, ते दुर्देव आहे. अनेक अहवालांमध्ये न अडकता सत्य परिस्थिती काय आहे, ते समजून घेणे गरजेचे आहे.

Pune Deenanath Mangeshkar Hospital: पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात घटनेच्या पंधरा दिवसानंतर रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु या प्रकरणात अजून ठोस कारवाई होत नाही. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार यांनी टीका केली आहे. हत्येला जबाबदार असणाऱ्यांना निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केले होते आणि आज जे वक्तव्य केले आहे त्यात खूप फरक आहे. एका हत्येला जबाबदार असणाऱ्या लोकांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, ते दुर्देव आहे. अनेक अहवालांमध्ये न अडकता सत्य परिस्थिती काय आहे, ते समजून घेणे गरजेचे आहे. सर्व गोष्टी समोर स्पष्ट आहेत. त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी शासनानेच प्रयत्न करायला हवे. परंतु दुर्देवाने तसे होताना दिसत नाही.
राज्यातील पाणी टंचाईबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, जलजीवन मिशन नावाचा चांगला उपक्रम देशात राबवला गेला. परंतु राज्यात आणि देशात असणारे डबल इंजिन सरकार पाण्याचे नियोजन करु शकत नाही. आज लोक एक एक थेंब पाण्यासाठी फिरत आहे. हे राज्यकर्त्यांचे अपयश आहे.




तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाचा अहवाल पोलिसांना मिळाला. त्या अहवालातून रुग्णालयाला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर टीका होऊ लागल्यावर शनिवारी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पुणे येथील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डॉ.घैसास यांनी रुग्णाचे वेळेवर उपचार सुरु केले नाही. पैसे न मिळाल्याने तिष्ठत ठेवले. त्यामुळे हलगर्जीपणाचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल झाला आहे.