शरद पवारांना काही झालं तर गृहखातं जबाबदार – सुप्रिया सुळे
शरद पवार यांना काहीही झालं तर त्याची जबाबदारी राज्याच्या आणि देशाच्या गृहखात्याची असेल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि शरद पवार यांची कन्या, खासदार खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्या तातडीने पोलीस आयुक्तांना भेटल्या. ‘ पवार साहेबांना काहीही झालं तर त्यासाठी गृहखातं जबाबदार असेल ‘ असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.
शरद पवार यांना मिळालेल्या धमकीनंतर सुप्रिया सुळे यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. ‘ पवार साहेब हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना काहीही झालं तर ती केवळ राज्याचेचे नव्हे तर देशाचं गृहखातंही जबाबदार असेल’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शकतेने चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. तसेच याप्रकरणी आपण केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच नव्हे तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनाही हे निवेदन करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
वेबसाईटवरून धमकी दिली जात आहे. अशा धमक्या येत असतील तर गृहमंत्र्यांनी तातडीने नोंद घ्यावी. हा विषय मुंबईच्या पोलीस आयुक्तांसमोर मांडला आहे. पवारांना आलेली धमकी दुर्दैवी आहे. राजकारणात मतभेद असतात पण द्वेष ज्या पद्धतीने पसरवला जातो आहे, ते वाईट आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. या प्रकरणाचा पाठपुरावा करून आम्हाला योग्य न्याय मिळावा. या सगळ्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शरद पवारांना मिळाली धमकी
राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली आहे. तर सौरभ पिंपळकर याने ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकी दिली आहे. आयुष्यभर सुपारी कात्रत खाल्ल्यामुळे औरंगजेबाच तोंड मरताना वाकडं होऊन मेलं म्हणते हे खरं आहे का? असं असेल तर इतिहास पुनरावृत्ती करणार म्हणजे, अशी धमकी सौरभ पिंपळकर या ट्विटर अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे.