“आजच्या दिवशी शत्रूला देखील मित्र म्हणून समजलं जातं”; ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांना आज मित्रत्वाची उपमा दिली
होळी सणाचा राज्यभर जल्लोष सुरु असला तरी, राजकीय होळीचा जल्लोष जोरदार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांकडून आज आरोप-प्रत्यारोप झाले नसले तरी टोला लगवण्याची संधी मात्र एकाही नेत्याने आज सोडली नाही.
अहमदनगरः होळी सण राज्यभर दणक्यात साजरा होत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होळी सणानिमित्त यावेळी विरोधकांना माफ केलं हाच आमचा बदला असं म्हणून त्यांनी विरोधकांना शुभेच्छाही आणि टोलाही लगावला आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना शुभेच्छा देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी आजपासून मनभेद-मतभेद विसरून महाराष्ट्रासाठी एकत्र येऊन काम करू असं आवाहन केले आहे.
या दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रियेनंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनाही शुभेच्छा देताना त्यांनी टोला वजा शुभेच्छा दिल्या आहे.
त्यांना टोला लगावताना त्या म्हणाल्या की, खेड इथल्या विराट सभेचे उद्धवदर्शन बघून चंद्रशेखर बावनकुळे आणि फडणवीस साहेबांना उपरती झाली असेल असा टोला त्यांनी लगावला आहे.
फडणवीस आणि बावनकुळे यांनी शुभेच्छा दिल्या असल्या तरी ती चांगली गोष्ट आहे, आणि त्याचं आम्हाला कौतूक असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.
सुषमा अंधारे यांनी बोलताना सांगितले की, आज होळीचा धुळवळीचा दिवस आहे. आजच्या दिवशी शत्रूलादेखील मित्र म्हणून समजलं जातं.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या असल्या तरी आम्ही त्यांच्या टिपणीकडे सकारात्मक पद्धतीने बघतो असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
सुषमा अंधारे यांनी आज होळीनिमित्त जोरदार फटकेबाजी करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. आजच्या दिवशी त्यांनी माफ केले असं म्हटलं असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे.
मात्र साऱ्यांनी एकत्र येऊन राजकारणात काम करायचं असेल तर आधी घरं फोडणं बंद केलं पाहिजे खोचक टोलाही त्यांना लगावण्यात आला.
भाजप आणि शिंदे-फडणवीस सरकारकडून ठाकरे गटातील महिल्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. त्यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
तुम्ही आमच्या घरातल्या महिलांवर शिंतोडे उडवायचे, आमच्याच माणसांना आमच्या अंगावर सोडावे आणि पुन्हा जर साजूकपणाचा आव आणत असाल तर ऐसा कैसा चलेगा असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.