सुषमा अंधारे यांच्याकडून Video पोस्ट, ‘हा गिरीश कोळी… एकनाथ शिंदेंविरोधात पोस्ट टाकणाऱ्याला मारहाण’, काय आहे प्रकरण?
ठाण्यातील रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्याचं प्रकरण घडलं असतानाच सुषमा अंधारे यांनी आणखी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. याद्वारे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत.
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) सुरु असलेलं शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध ठाकरे गटातील युद्ध आता थेट मैदानावर दिसून येत आहे. ठाण्यात काल झालेला राडा सोशल मीडियातील पोस्टमुळेच होता, ही बाब उघडकीस आली आहे. ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या महिला पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब रोशनी शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्यात येत आहेत. तर ठाकरे गटाच्या नेत्यांनीही यावरून जोरदार टीका सुरु केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात लिहिणाऱ्या-बोलणाऱ्यांविरोधात कशी दडपशाही सुरु आहे, हे दाखवण्यासाठी सुषमा अंधारे यांनीही एक व्हिडिओ शेअर केलाय. फेसबुक पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी गिरीश कोळी हे नाव घेत व्हिडिओ शेअर केला असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केलेत.
व्हिडिओमध्ये काय?
ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरण तापल्यानंतर सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत दोघे जण एका व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण करत आहेत. तू साहेबांबद्दल बोलायचं नाही, तू का बोलतो साहेबांबद्दल, तू पोस्ट काढायची, साहेबांना सॉरी म्हणायचं…तुला मी किती वेळा समजावलं.. तू आधी पोस्ट डिलीट कर… असे बोलत सदर व्यक्तीला मारहाण केल्याचं दिसून येतंय.
सुषमा अंधारेंची पोस्ट काय?
सदर व्हिडिओवरून सुषमा अंधारे यांनी पोस्टमध्ये लिहिलंय… हा गिरीश कोळी. ठाण्यातीलच..! एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात पोस्ट टाकतो का असं म्हणत याला बेदम मारहाण केली. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला गेला मात्र पोलिसांनी तक्रारच नोंदवून घेतली नाही. संविधानातील प्रकरण तीन कलम 19 नुसार प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे परंतु अशा पद्धतीने जर जनतेच्या लिहिण्या बोलण्यावर मर्यादा घालत त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या, प्रत्यक्ष मारहाण , चारित्र्यावर शिंतोडे वेगवेगळ्या पोलीस केसचा ससेमिरा..!! हे असेच चालू राहणार असेल तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जरा समजावून सांगावे की, आपण राज्याचे चालक-पालक होण्यासाठी मुख्यमंत्री झालेले आहात की, जो कोणी आपल्यावर जराही टीकाटिपणी करेल आपल्या विरोधात मत मांडेल, आपले निर्णय पटले नाहीत असे सांगेल त्याला आयुष्यातून उध्वस्त करण्यासाठी मुख्यमंत्री झाला आहात ?