चालक बेशुद्ध… बियरचा अख्खा कंटेनरच गायब केला…मौजमजा करण्याआधीच गेम फसला…
चालक शुद्धीवर आल्यावर त्याने घोटी पोलिसांत धाव घेत सर्व हकीकत सांगितली. मोहम्मद साजिद अबूल जैस शेख असे चालकाचे नाव असून त्याने पोलिसांत फिर्याद दिली होती.
नाशिक : नाशिकच्या ग्रामीण पोलीसांच्या घोटी पोलीसांनी एक मोठी कारवाई केली आहे. नाशिकच्या घोटी परिसरात एका कंटेनर चालकाला बेशुद्ध करून कंटेनरच चोरल्याची घटना घडली होती. खरंतर हा कंटेनर बियरचा असल्याने चोरीला गेल्याची माहिती समोर आली होती. नाशिक शहरासह ग्रामीण भागात गुन्हेगारी फोफावत असतांना घोटी पोलीसांनी दमदार कामगिरी केली आहे. चालकाला बेशुद्ध करून बियरच्या बॉक्सने भरलेला कंटेनर चोरलेल्या घटनेची उकल करत मोठी कारवाई केली आहे. 24 तासाच्या आताच ही कारवाई करण्यात आली असून कंटेनरसह बियरचे बॉक्स देखील हस्तगत करण्यात आले आहे. औरंगाबाद येथून दोन दिवसापूर्वी बियरच्या बॉक्सने भरलेला एक कंटेनर मुंबईच्या दिशेने जात होता. त्यात घोटी जवळप असतांना चालकाला शिवीगाळ करत दमदाटी करून कंटेनर सिन्नर परिसरात घेऊन गेले होते.
कंटेनर सिन्नर रोड जवळ उभा करत चालकाला बेशुद्ध करण्यात आले होते. त्यानंतर संशयित आरोपीने तेथेच चालकाला सोडून देत त्याच्या ताब्यातील कंटेनर आणि त्यात बियरचे असलेले दोन हजार दोनशे बॉक्स पळवून नेले होते.
चालक शुद्धीवर आल्यावर त्याने घोटी पोलिसांत धाव घेत सर्व हकीकत सांगितली. मोहम्मद साजिद अबूल जैस शेख असे चालकाचे नाव असून त्याने पोलिसांत फिर्याद दिली होती.
घोटी पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला होता, 24 तासाच्या आताच घोटी पोलीसांनी आरोपींना अटक करत कंटेनर आणि काही बियरचे बॉक्स ताब्यात घेतले आहे.
गुन्ह्याचा तपास करताना नांदगाव तालुक्यातील अस्तगाव येथे एका शेतात पळवून नेलेल्या बिअरच्या बॉक्सचा साठा करून ठेवण्यात आला होता. तेथून दीपक बच्छाव यास ताब्यात घेतले होते.
त्याला पोलिसी खाक्या दाखवताच नीलेश जगतापच्या सांगण्यावरून साठा केल्याची कबुली दिली होती. त्यातील काही माल हा नाशिकच्या हरसुल येथून हस्तगत करण्यात आला आहे.
या चोरीच्या काळात पळवून नेलेल बियरचे बॉक्स ठेवण्यासाठी ज्या वाहनांचा वापर करण्यात आला ते आयशर टेम्पो, पिकअपसह, एर्टिगा चारचाकी आणि कंटेनर असा 55 लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी दहा संशयितांना गजाआड करण्यात आले असून निलेश विनायक जगताप, आकाश विनायक जगताप, चेतन अशोक बिरारी, दीपक शिवाजी बच्छाव, महेश शिवाजी बच्छाव, विकास भिमराव उजगरे, धीरज रमेश सानप, गणेश निंबा कासार, मनोज शांताराम पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.