तेरणा साखर कारखान्याचा प्रश्न अखेर मिटला, कारखाना आमदार डॉ. तानाजी सावंतांकडे 25 वर्षासाठी भाडेतत्त्वावर
तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना (Terna Sugar factory) आगामी 25 वर्षासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय अखेर झाला आहे. शिवसेना नेते आमदार डॉ. तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant) यांच्या भैरवनाथ शुगरला (Bhairavnath Sugar) हा कारखाना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उस्मानाबाद : कधीकाळी जिल्ह्यातील राजकारणाचं प्रमुख केंद्र असलेला आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना (Terna Sugar factory) आगामी 25 वर्षासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय अखेर झाला आहे. शिवसेना नेते आमदार डॉ. तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant) यांच्या भैरवनाथ शुगरला (Bhairavnath Sugar) हा कारखाना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर घेण्यात आला. मार्च 2022 पर्यंत कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र, आगामी गळीत हंगामापासून तेरणेचे गाळप पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.
तेरणा कारखाना यापुर्वीपासून जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरविणारा ठरला आहे. हा कारखाना आमदार तानाजी सावंत यांच्या ताब्यात गेल्याने आगामी काळात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. कार्यक्षेत्र असलेल्या उस्मानाबाद, कळंब तालुक्यासह अन्य भागातील अर्थकारण व राजकारण बदलणार आहे. आमदार सावंत यांच्याकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील 4 साखर कारखाने ताब्यात आल्याने त्याचा सहकार क्षेत्रातील दबदबा वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
देशमुख समूहाच्या 21 शुगर्सने वेळेत निविदा सादर केली नाही
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार, उपाध्यक्ष कैलास शिंदे, संचालक सुनील चव्हाण, सतीश दंडनाईक, संजय देशमुख-देसाई, विकास बारकुल, विजय घोणसे-पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते. तेरणा संघर्ष समितीने जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाचा व भैरवनाथ शुगर समूहाच्या प्रतिनिधी यांचा सत्कार केला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कार्यकारी संचालक धनंजय सावंत, युवा सेनेचे राज्य विस्तारक सुरज साळुंके, यांच्यासह तेरणा साखर कारखाना बचाव संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. भैरवनाथ शुगर वर्क्स यांनी वेळेत निविदा सादर केल्याने ती ग्राह्य धरली गेली. तर लातूर येथील देशमुख समूहाच्या 21 शुगर्सने वेळेत निविदा सादर न केल्याने ती ग्राहय धरली गेली नाही. निविदा सादर करतेवेळी समूह कार्यकारी संचालक रवींद्र शेलार, संचालक विक्रम उर्फ केशव सावंत यांनी बाजू मांडली.
तेरणा संघर्ष समितीचे सदस्य व संचालक यांच्यात खडाजंगी
जिल्ह्यातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी गुरुवारी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत भैरवनाथ शुगर वर्क्स यांनी वेळेत निविदा सादर केल्याने ती ग्राहय धरली जाणार आहे तर लातूर येथील 21 शुगर्सने वेळेत निविदा सादर न केल्याने ती ग्राहय धरायची की नाही यावर संचालक मंडळात बैठकीपूर्वी जोरदार चर्चा झाली. 21 शुगर्सने दिलेल्या निविदा बाबत अनेक कायदेशीर बाबी होत्या तसेच संचालक मंडळात 2 मतप्रवाह असल्यामुळे दुपारी 1 वाजता सुरु होणारी बैठक 4 वाजता सुरु झाली. 21 शुगरबाबत कायदेशीर चौकटी पाहून निर्णय घेण्यात आला. दरम्यानच्या काळात तेरणा संघर्ष समितीचे सदस्य व संचालक यांच्यात खडाजंगी झाली.
असा आहे संपूर्ण व्यवहार आणि भाडे आकारणी?
तेरणा शेतकरी सहकारी कारखाना अवसायनात निघाला असून पाच हजार मेट्रीक टन इतकी गाळप क्षमता व देशी दारुचे उत्पादन, तसेच वीज निर्मीतीचा 14 मेगावॅटचा प्रकल्पचा समावेश आहे. भाडेतत्वावर देताना हा कारखाना 25 वर्ष करारावर देण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या चार वर्षी दोन कोटी रुपये, तर पाच ते करारसंपेपर्यंत सहा कोटी रुपये वार्षिक भाडे स्विकारले जाणार आहे. शिवाय भाड्यापोटी प्रतिमेट्रीक टन गाळपावर पहिले तीन वर्ष प्रति लिटर 73 रुपये, चौथ्या वर्षापासुन करार संपेपर्यंत 81 रुपयाप्रमाणे दिले जाणार आहे. डिस्टलरी पहिले दोन वर्ष प्रतिलिटर एक रुपये, दोन वर्ष दोन रुपये व पाचव्या वर्षीपासून चार रुपये करार संपेपर्यंत असणार आहे. देशी दारुवर पहिले दोन वर्ष प्रतिलिटर एक रुपये, दोन वर्ष दोन रुपये पाचव्या वर्षापासुन तीन रुपये आकारले जाणार आहे. वीजनिर्मीती प्रकल्पाच्या उत्पादनावर पहिले चार वर्ष दोन टक्के तर पाचव्या वर्षापासुन करार संपेपर्यंत तीन टक्के रक्कम आकारण्यात येणार आहेत. या भाडेकरारात कारखान्याची 105 हेक्टर 41 आर इतकी जमीन देखील मिळणार आहे. मालमत्ता जशी आहे आणि जिथे आहे, ज्या स्थितीत आहे, त्या स्थितीत अशा अटीवर व ज्यास कोणतीही हमी, खात्री, बंधन, जबाबदारी वा प्रतिनिधीत्वाशिवाय असलेल्या तत्वावर भाड्याने देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील राजकारणात सावंतांचा दबदबा वाढणार
तेरणा कारखान्याचे जवळपास 120 खेडेगावात 32 हजारच्यावर सभासद आहेत. उस्मानाबाद व शेजारील लातूर जिल्ह्यात संपर्क आहे. दीड हजार कामगार यांना रोजगार मिळणार आहे. यामुळे या भागातील आर्थिक गणित बदलणार आहे. तेरणा ज्याच्या ताब्यात त्याकडे आमदारकी असे आजवरचे गणित राहिले आहे. उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघात तेरणा कारखाना केंद्रबिंदू असतो. त्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलणार आहेत असेच दिसते. डॉ तानाजी सावंत हे सध्या शिवसेनेचे उपनेते, संपर्कप्रमुख तथा भुम- वाशी-परंडा मतदार संघाचे आमदार आहेत. सावंत यांचे आगामी राजकीय डावपेच काय असणार हे पाहावे लागेल.
इतर बातम्या :