ठाण्यात प्रशासनाकडून मनाई आदेश, ‘या’ 7 गोष्टी पाळणं बंधनकारक
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे शहरात पोलीस विभागाने मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार 1 मार्च रोजी मध्यरात्रीपासून 15 मार्चपर्यंत अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आलेत.
ठाणे : कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे शहरात पोलीस विभागाने मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार 1 मार्च रोजी मध्यरात्रीपासून 15 मार्चपर्यंत अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आलेत. मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी हे आदेश दिले (Thane Police restrict many things to keep law and order in city).
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यकमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय सध्या काही आंदोलनं सुरूही आहेत. 11 मार्च 2021 रोजी महाशिवरात्री, छत्रपती संभाजी राजे बलिदान दिन, 12 मार्च रोजी शब-ए-मेराज असे सण उत्सव संपन्न होणार आहे. या काळात सार्वजनिक शांतता आणि कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी खबरदारी म्हणून हे आदेश देण्यात आलेत.
मनाई आदेशात कशावर निर्बंध?
1. शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठया किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करण्यास मनाई.
2. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करण्यास मनाई.
3. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेण्यास मनाई.
4. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविण्यास मनाई.
5. कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे/प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करण्यास मनाई.
6. सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्यशासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करण्यास मनाई.
7. पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे घोषणा, प्रति घोषणा देणे इ. कृत्यांना मनाई.
‘या’ व्यक्तींना मनाई आदेश लागू राहणार नाही
सरकारी नोकर किंवा वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य बजावण्यासाठी शस्त्रे घेणे भाग पडेल किंवा अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांना या मनाईतून सूट देण्यात आलीय. लग्न कार्यासाठी जमलेले लो, प्रेत यात्रा आणि अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका, सरकारी/ निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त आणि त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका, सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांचे कामाच्या ठिकाणांना यातून सूट देण्यात आलीय.
हेही वाचा :
तलवारी नाचवणाऱ्या तरुणांसाठी पोलिसांची गांधीगिरी, मुलं वाममार्गाला लागू नये म्हणून अनोखी शक्कल
ठाणे TMT जाहिरात घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
व्हिडीओ पाहा :
Thane Police restrict many things to keep law and order in city