मांडव परतणीसाठी माहेरी येत होते नवविवाहित जोडपे, पण वाटेतच काळाने घाला घातला अन्…
मांडव परतणीसाठी नवविवाहित जोडप्यासह वऱ्हाडी टेम्पोने वधूच्या घरी चालले होते. मात्र चढावाच्या ठिकाणी रस्ता खराब असल्याने टेम्पो उलटला.
कर्जत : मांडव परतणीसाठी चाललेल्या वऱ्हाडाच्या टेम्पोला अपघात होऊन एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली. नेरळच्या आसलवाडी गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. लग्न झाल्यानंतर मुलीला मांडव परतणीसाठी नेत असताना हा अपघात घडला. आसालवाडी गावाजवळ चढावाच्या ठिकाणी रस्ता खराब असल्यामुळे हा पिकअप टेम्पो उलटला. या घटनेत अन्य 16 जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी तात्काळ भिवपुरी येथील रायगड रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी 16 वर्षीय मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुदैवाने नवरा-नवरी सुखरुप आहेत.
मांडव परतणीसाठी नवरीच्या माहेरी चालले होते
माथेरान डोंगररांगांमधील नाण्याचा माळ गावात राहणाऱ्या सांबरी कुटुंबातील मुलाचा नेरळच्या टपालवाडी गावात राहणाऱ्या भला कुटुंबातील मुलीशी सोमवारी विवाह झाला होता. या मुलीला मंगळवारी मांडव परतणीसाठी न्यायला तिच्या माहेरचे लोक पिकअप टेम्पो घेऊन आले होते. तिथून संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास निघून टपालवाडी गावाकडे जात असताना आसालवाडी गावाजवळ चढावाच्या ठिकाणी रस्ता खराब असल्यामुळे हा पिकअप टेम्पो उलटला.
टेम्पो दरीत कोसळला
रस्त्याच्या बाजूला दरी असल्याने हा टेम्पो 50 ते 60 फूट खोल खाली कोसळला. याच वेळी टेम्पोतील 16 वर्षीय मुलगी बाहेर फेकली गेली आणि ती टेम्पोच्या चाकात अडकल्यामुळे टेम्पो जागीच थांबला. या घटनेत टेम्पोतील 16 जण जखमी झाले. यात नवरा मुलगा आणि नवऱ्या मुलीचाही समावेश आहे. या सर्वांना बाहेर काढल्यानंतर टेम्पोच्या चाकात अडकलेल्या मुलीला बाहेर काढण्यात आलं. मात्र तिला बाहेर काढताच टेम्पो पुन्हा एकदा खोल दरीत कोसळला.
मुलीच्या मृत्यूप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद
या सर्वांना तातडीने भिवपुरी इथल्या रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. इतर 16 जणांवर उपचार सुरू आहेत. मुलीच्या आई-वडिलांचा याआदीच मृत्यू झाला असून, ती भावासोबत राहत होती. या घटनेनंतर नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात येऊन पाहणी केली. मुलीच्या मृत्यूप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.