Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांच्या मुलाने फोन करताच अधिसूचना रद्द, काय आहे ठाण्याच्या सर्विस रोडचा विषय?
Eknath Shinde | 'हे जरा अतीच झाले असे वाटत नाही का? गृहमंत्री जी!'. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातीत सर्विस रोडवरुन टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. सध्या मुख्यमंत्र्यांसमोर मराठा आरक्षण आंदोलनाचा विषय आहे. मराठा समाजाची मागणी कशी पूर्ण करायची? हे मुख्यमंत्र्यांसमोर मुद्दा आहे.
ठाणे : ‘वर्षा’ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान आहे. पण त्यांचं मूळ घर ठाण्यात आहे. ठाण्यात वागळे इस्टेट लुईसवाडी येथे त्यांचा शुभदिप बंगला आहे. ठाण्यात त्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे राहतात. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराकडे जाणाऱ्या एका सर्विस रोडवरुन विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी लगेच पावल उचलली व वाद अधिक वाढणार नाही याची काळजी घेतली. ठाण्यात वागळे इस्टेट लुईसवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुभदिप बंगला आहे. त्यांच्या घराकडे जाणाऱ्या सर्विस रोड बंद करण्यासाठी ठाणे शहराच्या वाहतूक विभागाने अधिसूचना काढली होती. खासदार श्रीकांत शिंदे व त्यांच्या कुटुंबियांची सर्विस रोड मार्गावरुन ये-जा असते. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी असं अधिसूचनेत म्हटलं होतं.
त्यावरुन ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांनी टि्वट केलं. “मुख्यमंत्री पुत्र खा. श्रीकांत शिंदे व त्यांच्या कुटुंबाला ये जा करण्यासाठी ठाण्यातील अख्खा सर्विस रोड बंद केला जातो. हे जरा अतीच झाले असे वाटत नाही का? गृहमंत्री जी!. पोलिस खात्याची मिंधेगिरी!” अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी लगेच आपली भूमिका स्पष्ट केली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी फोन केला. अशी कोणतीही अधिसूचना जेणेकरून जनतेला त्रास होईल हे आम्हाला मान्य नाही, असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. त्यानंतर सदर अधिसूचना रद्द करण्यात आली. ठाणे शहर वाहतूक विभागाकडून बुधवारी 1 नोव्हेंबरला वाहतूक नियंत्रण अधिसूचना क्रमांक 177 ही चालू घडामोडीं पार्श्वभूमीवर अधिसूचना पारित करण्यात आली होती.
मुख्यमंत्री पुत्र खा. श्रीकांत शिंदे व त्यांच्या कुटुंबाला ये जा करण्यासाठी ठाण्यातील अख्खा सर्विस रोड बंद केला जातो. हे जरा अतीच झाले असे वाटत नाही का? गृहमंत्री जी! पोलिस खात्याची मिंधेगिरी!@AUThackeray@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis @AHindinews pic.twitter.com/QZBCf3mL3C
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 1, 2023
मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय?
ठाकरे आणि शिंदे गट परस्परांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सध्या मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रश्न सोडवण्याच आव्हान आहे. राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या भावना खूप तीव्र आहेत. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसाचाराच गालबोट लागलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत मागे हटणार नाही हे स्पष्ट केलय. त्यामुळे मराठा समाजाला टिकणार आरक्षण कसं द्यायच? या आंदोलनावर कसा तोडगा काढायचा? हे सध्याच्या घडीला मुख्यमंत्र्यांसमोरच महत्त्वाचे प्रश्न आहेत.