Crime : ‘शाळेतील दादाने माझे कपडे…’; बदलापूरमधील पीडित चिमुकलीने सांगितलं शाळेत काय घडलं!
बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकलींवर नराधमाने लैंगिक अत्याचार केला होता. मंगळवारी आरोपीला शिक्षा देण्याची मागणी करत बदलापूरकर थेट रेल्वे स्टेशनवर उतरले होते. तब्बल आठ तास सुरू असलेलं आंदोलन पोलिसांनी मोडून काढलं. चिमुकलींना किती त्रास झाला असेल याचा कोणी विचार करू शकत नाही. आरोपीचं नाव घेत पीडित चिमुकलीने काय घडलं ते सांगितलं.
महाराष्ट्रामधील ठाणे जिल्ह्यामधील बदलापूर येथे आदर्श शाळेमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली. साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेमधील आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी बदलापूरकरांनी थेट स्टेशनमध्ये जात ठिय्या दिला होता. मंगळवारी सकाळपासून सुरू असलेलं आंदोलन पोलिसांनी संध्याकाळी मोडून काढलं. पोलिसांनी ट्रॅकवरून बाजूला होण्याची विनंती केली होती. मात्र ते काही हटले नाहीत, शेवटी पोलिसांनी संध्याकाळी सहाच्या सुमारास लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगवलं. या प्रकरणामध्ये पीडित मुलींच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या एफआयआरचा तपशील समोर आला आहे.
पीडित मुलीने 16 ऑगस्टला शाळेमध्ये जाण्यास नकार दिला होता. घरच्यांनी सांगितल्यानुसार ती शाळेत जायचं म्हटलं की प्रचंड घाबरली होती. प्राईव्हेट पार्टच्या ठिकाणी तिला त्रास होत असल्याचं तिने घरी सांगितलं. त्यानंतर घरच्यांनी तिला दवाखान्यात नेलं, त्यावेळी डॉक्टरांनी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याची माहिती दिली. एफआयरनुसार चिमुकलीवर 13 ऑगस्टला सकाळी 9 ते 12 च्या सुमारास हा प्रकार चिमुकलीसोबत घडला होता. याआधी एका पालकांनी तक्रार दाखल केली होती.
“ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” हे वाक्य एका ३ वर्षे ८ महिन्याच्या मुलीचं… आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या “दादा” ने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं. बदलापुरच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय. शाळेचे ट्रस्टी अर्थातच…
— Adv.Jayesh Wani – अॅड.जयेश वाणी (@jayeshwani) August 19, 2024
एका पीडित मुलीने तिच्या कुटुंबीयांना सांगितले की, शाळेतील दादाने कपडे काढून प्रायव्हेट पार्टला हात लावला. सफाई कामगार असलेला आरोपी अक्षय शिंदे याने याच्यावर पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमे लावत गुन्हा दाखल केला आहे. शाळा प्रशासन आणि पोलिसांना या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने लोकांनी एकत्र येत बदलापूर बंद ठेवण्याची घोषणा केली.
पीडित कुटूंबाची तब्बल 12 तास तक्रार नोंदवली गेली नव्हती. मंगळवारी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत सर्वांना रेल्वे स्टेशनच्या पटरीवर ठिय्या आंदोलन केलं. शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि एका महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांंचे तत्काळ निलंबन करण्याचे आदेश दिलेत.