जेव्हा भाजपचे संयमी आमदार भडकतात, लसीकरण केंद्रावरील सावळ्या गोंधळावरुन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ
लसीकरण केंद्रावर नियोजनशून्य कारभार आढळल्याने कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड तेथील कर्मचाऱ्यांवर चांगलेच संतापले (BJP MLA Ganpat Gaikwad angry on Municipal employees at vaccination center).
ठाणे (कल्याण) : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेची गती मंद झाली आहे. मात्र, राज्यभरातील अनेक लसीकरण केंद्रांवर नागरिकांची तुफान गर्दी होताना दिसतेय. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील उल्हासनगर येथील एका लसीकरण केंद्रावरही तशीच गर्दी जमली होती. विशेष म्हणजे लसीकरण केंद्रावर सकाळी चार वाजेपासून अनेक वयोवृद्ध नागरिक आलेले होते. त्यांना ऑफलाईन टोकण पद्धतीने लस दिली जाणार होती. मात्र, तिथे प्रशासनाचं नियोजनशून्य कारभार आढळल्याने कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड तेथील कर्मचाऱ्यांवर चांगलेच संतापले (BJP MLA Ganpat Gaikwad angry on Municipal employees at vaccination center).
लसीकरण केंद्रावर आमदारांना संताप अनावर
गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व मतदारसंघात जवळपास तीन वेळा निवडून आले आहेत. एक शांत, संयमी आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. मात्र, लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी बघून त्यांचा संयमाचा बांध फुटला. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांवर थेट शिवीगाळ केली. कर्मचाऱ्यांनी ऐकलं नाही तर त्यांना मारहाण करु, असा इशारा त्यांनी दिला (BJP MLA Ganpat Gaikwad angry on Municipal employees at vaccination center). संबंधित घटना ही कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या उल्हासनगर कॅम नंबर चार परिसरातील आहे. त्याठिकाणी एका शाळेतील कोरोना लसीकरण केंद्रावर नागरीकांची एकच गर्दी होती.
संतापात गणपत गायकवाड नेमकं काय म्हणाले?
“ऐ शान्या, मी मारेल हा. लक्षात ठेव. ऑनलाईन वाल्यांना तरी आतमध्ये घ्यायचं. नाहीतर ठोकायचं चालू केलं तर कुणाचंच ऐकून घेणार नाही. ऑफलाईन वाल्यांना उत्तर देण्यासाठी तुमच्या बापांना पाठवा इथे. तुमचे बाप कोण असतील त्यांना पाठवा. तुमच्या बापांना पगार देता का? सरकारचे पैसे खाताय ना तुम्ही? तुम्ही महापालिकेचे लोकं इंजेक्शन विकून खाताय”, अशा शब्दात गायकवाड यांनी लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्त केला. या प्रकरणाचा व्हिडीओ कोणीतरी कॅमेऱ्यात अचूकपणे कैद केलाय. हा व्हिडीओ आता चर्चेचा विषय ठरला आहे.
‘लसीकरण केंद्रावर नागरिकांसोबत भेदभाव’
संबंधित घटनेनंतर आमदारांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी लसीकरण केंद्रावर नागरिकांसोबत भेदवाव केला जात असल्याचं सांगितलं. “राज्य सरकाकडून माझ्या मतदारसंघात लसीकरणाचं काम सुरु आहे. पण लसीकरणात बऱ्याच ठिकाणी नागरिकांसोबत भेदभाव केला जातोय. काही नागरिकांना टोकण दिलं जातं. त्यांना लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर बोलावलं जातं. पण त्यांना तासंतास लसीसाठी भर ऊन्हात ताटकळत उभं ठेवलं जातं”, असं आमदारांनी सांगितलं.
‘वयोवृद्ध सकाळी चार वाजेपासून लसीकरणासाठी ऑफलाईन रांगेत उभे’
“मी ज्या लसीकरण केंद्रावर भेट दिली त्या ठिकाणी एका बाजूला ऑनलाईन तर दुसऱ्या बाजूला ऑफलाईनची रांग होती. संबंधित लसीकरण केंद्रावर काही वयोवृद्ध व्यक्ती सकाळी चार वाजेपासून लसीकरणासाठी ऑफलाईन रांगेत उभे होते. मात्र, दहा ते साडे दहा वाजेपर्यंत तिथे कुणीही अधिकारी-कर्मचारी नव्हता”, असं गणपत गायकवाड यांनी सांगितलं.
‘डॉक्टरांनीही उत्तर दिलं नाही’
“मी डॉक्टरांना फोन केला. ते अर्ध्या वाटेवर होते. माझं त्यांच्यासोबत बोलणं झालं. डॉक्टरांनी सांगितलं की, ते आज फक्त ऑनलाईन नोंदनी केलेल्यांना लस देणार आहेत. ऑफलाईनला देणार नाहीत. मग मी त्यांना जाब विचारला, जी वयोवृद्ध लोकं सकाळी चार वाजेपासून लसीकरण केंद्रावर टोकण घेऊन उभे आहेत त्यांना का बोलावलं? त्यावर कुणीही उत्तर दिलं नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
‘काहीजण जाणीवपूर्वक मला बदनाम करत आहेत’
“लसीकरण केंद्रावर तर त्यापेक्षा भयानक होतं. तिथे ऑनलाईनची रांगही थांबवण्यात आली होती. काही लोक राजकारण करुन माझं नाव खराब करत आहेत. त्यामुळे रागात मी तुमचा बाप कोण आहे? असं विचारलं. लसीकरण केंद्रावर जो उद्धटपणे वागत होता त्याच्याशी मी उद्धटपणे बोललो. मी कोणत्याही डॉक्टरांना उद्धट बोललो नाही”, असं स्पष्टीकरण गणपत गायकवाड यांनी दिलं.
कर्मचाऱ्यांकडून आमदारांच्या वागणुकीचा निषेध
दरम्यान, लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी आमदारांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आमदारांच्या वागणुकीचा निषेध केला आहे. तसेच आंदोलन करण्याचा देखील इशारा दिला आहे.
हेही वाचा : तेव्हा श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता!, फडणवीसांचा पलटवार