‘माझं समर्थन नाही पण ॲक्शनला रिॲक्शन पाहायला मिळाली’; ठाण्यात झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री शिंदेची प्रतिक्रिया
ठाण्यामध्ये शनिवारी रात्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या ठिकाणी मोठा राडा पाहायला मिळाला. त्याआधी उद्धव ठाकरेंच्या येणाऱ्या ताफ्यावर शेण, टोमॅटो आणि नारळ फेकल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले या सर्व राड्यावर एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ठाण्यात शनिवारी रात्री मोठा राडा पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे गटाचा मेळावा ठाण्यात पार पडला जाणार होता. मात्र त्याआधी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ आणि शेण फेकले त्यानंतर मेळाव्याच्या ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. या राड्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी उबाठा गटाने चुकीचं आंदोलन केलं होतं. त्यामुळे अॅक्शनला रिअॅक्शन असते ती पाहायला मिळाली. सरकार स्थापन झाल्यापासून पडणार म्हणाले पण सरकार मजबूत झालं. शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही असा निर्णय घेतला. लोकसभेलापण जर स्ट्राईक रेट पाहिला तर लोकांची पसंती कोणाला आहे हे आम्हाला सांगायची गरज नाही. ठाण्यातील लोकांना औषध द्यायला जमतं, त्यांनी बरोबर जमलगोटा दिलाय. दिल्लीतून मातोश्रीमध्ये बैठका होत होत्या पण आता दिल्लीकडे लोटांगण घातली जात असल्याचं एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं.
माझ्या दाढीची त्यांना धास्ती आहे. या दाढीनेच त्यांची गाडी खड्ड्यात घातली. बाळासाहेब असते तर त्यांना जंगलामध्ये फोटोग्राफीसाठी पाठवलं असतं. आत काही लोक मला मुख्यमंत्री करा म्हणून कटोरा घेऊन फिरतात. माझ्या लाडक्या बहिणींना एकच सांगायचं आहे की कपटी भावापासून सावध राहा, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.
गाड्यांवर बांगड्या आणि शेण फेकलेही फेकले गेले. चार ते पाच गाड्यांचे नुकसान झालं आहे. वाहन चालकच्या दिशेने नारळ वेगाने आल्याने वाहनचालकांमध्ये अपघात होण्याची भीती निर्माण झाली. मात्र वाहनचालकांनी गाडीवर नियंत्रण मिळवत गाडी कंट्रोल केली. सर्वात पुढे ताफ्यामध्ये चेंबूरचे विभाग क्रमांक 9 चे प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या गाडीवर नारळ भिरकावले असून त्याचा वाहन चालक थोडक्यात बचावला.