उद्धव ठाकरेंच्या पालघर दौऱ्याची जोरदार चर्चा, जाणून घ्या काय आहे कारण?
उद्धव ठाकरे ज्या गावांचा दौरा करणार आहेत तो जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण पूर्णपणे भाजपचा गड आहे. | CM Uddhav Thackeray
पालघर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) शुक्रवारी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची एकूण आखणी पाहता राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक गावांची निवड केल्याचे समजते. (CM Uddhav Thackeray palghar visit)
उद्धव ठाकरे ज्या गावांचा दौरा करणार आहेत तो जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण पूर्णपणे भाजपचा गड आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नेमका हाच गट का निवडला, अशी कुजबुज सुरु झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्ह्याच्या जव्हार भागातील पर्यटन स्थळाच्या विकासात्मक बाबींसह जिल्ह्यातील विविध विषयांवर बोलणार असले तरी जव्हारच्या ज्या गावांमध्ये मुख्यमंत्री स्थळांना भेटी देणार आहेत, तो परिसर भाजपची व्होटबँक असल्याने भाजपच्या गोटात चलबिचल सुरु असल्याचे समजते.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची चर्चा का?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न्याहाळे बुद्रुक जिल्हा परिषद गट अंतर्गत जामसर वापर पाडा व खडखड धरणाला भेट देणार आहेत. याचबरोबरीने ते शिरपामाळ या पर्यटनाला भेट देणार असल्याचे समजते तर डेंगाचीमेट येथेही ते भेट देणार असल्याचे सांगितले जात आहे.
जामसर प्राथमिक आरोग्य केंद्र, जामसर अंगणवाडी, खरवंद अंगणवाडी, धापर पाडा धरण, खडखड धरण समाविष्ट असलेली ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आहे. जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या व न्याहाळे बुद्रुक या जिल्हा परिषद गटाच्या सदस्य या भाजपातुन निवडून आलेल्या आहेत. तर सारसुन व न्याहाळे बुद्रुक पंचायत समिती गण हे दोन्ही गण भाजपच्याच हातात आहेत.
या गटात असलेल्या बारा ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायतींची सत्ता भाजपकडे आहे. त्यामुळे एकंदरीत हा पूर्ण गण भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून राखून ठेवला आहे. त्यामुळे भाजपचा गड फोडण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः या गटात दाखल झाले का, असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लढवले जात आहेत. त्यामुळे या दौऱ्यात मुख्यमंत्री पालघर जिल्ह्यासाठी काही घोषणा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या:
या तर मीडियातील बातम्या, तुमचे सोर्सेस काय, हे मला कळू शकणार नाही, अजितदादांचे पत्रकारांना टोले
महानगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपची नवी खेळी; पडद्यामागील निष्ठावंतांना घातली साद
(CM Uddhav Thackeray palghar visit)