मोहम्मद हुसेन खान, टीव्ही 9 मराठी, पालघर : पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आज (14 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात तुफान राडा झाला. आमदार सुनील भुसारा आणि निलेश सांबरे यांच्या गटात ही हाणामारी झाली. राष्ट्रवादीचे 6 तर काँग्रेसचे 1 सदस्य गट स्थापनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी हा गदारोळ झाला. या दरम्यान आमदार सुनील भुसारा आणि माजी सभापती काशीनाथ चौधरी यांनी धमकी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.
पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांची आणि उपाध्यशांची निवडणूक जवळ आली असल्याने जिल्हा परिषद गटस्थापनेसाठी निलेश सांबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे 6 सदस्य आणि काँग्रेसच्या 1 सदस्यांच्या पाठिंबाने गट स्थापन करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बसले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांच्या गटाचा याला विरोध होता. त्यामुळे जिल्हाधिकारींच्या दालनात निलेश सांबरे गट आणि सुनील भुसारा गटात मोठा गदारोळ झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला सदस्या मंदा घरट यांना दालनाबाहेर खेचून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.
राष्ट्रवादीचा जो गट स्थापन करण्यासाठी आला त्याला सुनील भुसारा यांनी विरोध दर्शवला आणि जिल्हाधिकारी यांच्या दालनातच तुफान गराडा घातला. यावेळी पालघरमधील राष्ट्रवादीचे प्रतिष्ठित सुहास संख्ये यांच्याशीही सुनील भुसारा यांनी शाब्दिक बाचाबाची केल्याचे दिसले. या प्रकारामुळे गट स्थापन करायला आलेल्या सदस्यांना धोका असल्याने त्यांनी पोलीस सुरक्षा मागविली. त्यानंतर सर्व सदस्यांना पोलीस मोठ्या बंदोबस्तात सुरक्षित ठिकाणे घेऊन गेले.
या प्रकरणावर जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे यांनी प्रतिक्रिया दिली. “20 तारखेला येऊ घातलेल्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीसाठी गट स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे सात सदस्य जिल्हाधिकाऱ्यांकडे वेळ घेऊन आलो होतो. जिल्हाधिकारी साहेबांनी सकाळपासून आम्हाला ताटकळत ठेवलं आणि बाहेर बसवून ठेवलं होते”, असं संदेश ढोणे यांनी सांगितलं.
“कलेक्टर यांनी आम्हाला पण त्या प्रकारची भेट दिली नाही म्हणून सात सदस्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी राष्ट्रवादीचेच आमदार सुनील भुसारा, माजी सभापती काशीनाथ चौधरी आणि इतरांनी कलेक्टर यांच्या केबिनमध्ये सदस्यांना धक्काबुक्की करण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. पक्षाचाच गट स्थापन करत आहोत आणि सर्व पक्षाचे सदस्य एकत्र असल्यामुळे गट स्थापन करीत आहोत. आम्हाला त्यांच्यापासून धोका असल्यामुळे आम्ही एसपी साहेबांचे आणि कलेक्टर साहेबांची संपर्क करून आम्हाला पोलीस सुरक्षा देण्याची मागणी केलेली आहे”, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे यांनी दिली (Dispute between two group of NCP at Nagpur collector office).
पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात तुफान राडा, राष्ट्रवादीचे दोन गट आमनेसामेन, दिग्गज नेत्यांमध्ये वाद #NCP #Palghar pic.twitter.com/rxfKcf8HrJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 14, 2021
हेही वाचा : VIDEO | भेळीवरुन वाद, तपोवन एक्सप्रेसमध्ये प्रवासी आणि फेरीवाल्यांमध्ये हाणामारी