MLC Election 2022: आधी भाजपला मतदान, आता म्हणतात गृहित धरू नका; मनसेच्या आमदाराच्या विधानाने भाजपमध्ये खळबळ
MLC Election 2022: राज्यसभेच्या मतदानावेळी मनसेचे एकमेव आमदार खूप चर्चेत आले होते. राज्यसभेची निवडणूक अटीतटीची असल्याने सर्वच पक्षांसाठी एक एक मत महत्त्वाचे होते. त्यामुळे भाजपने राज ठाकरे यांचं मन वळवून मनसेचं एक मत आपल्याकडे वळवलं होतं.
ठाणे: राज्यसभा निवडणुकीत मनसेने (mns) भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीतही (MLC Election 2022) मनसे भाजपला मतदान करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मते मागण्यासाठी भाजपचा एकही नेता गेला नाही. त्यामुळे मनसेनेही आपली भूमिका जाहीर केली नव्हती. आज मात्र मतदानाच्या दिवशी मनसे आमदार राजू पाटील यांनी आम्हाला कोणीही गृहित धरू नये असा इशारा देऊन भाजपची (bjp) डोकेदुखी वाढवली आहे. राज ठाकरे हे ऑपरेशनसाठी रुग्णालयात आहेत. अशावेळी ऐनवेळी राजू पाटील यांनी भाजपला इशारा दिल्याने भाजप नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहेत. त्यामुळे मनसेचं एक मत मिळवण्यासाठी भाजप नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. मनसेचं एक मत आपल्याकडे वळवण्यासाठी आताही आमदार आशिष शेलार यांच्याकडे भाजपने सोपवल्याचं सांगितलं जात असून शेवटच्याक्षणी शेलार यांना मनसेचं मत वळवण्यात यश मिळते का या कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यसभेच्या मतदानावेळी मनसेचे एकमेव आमदार खूप चर्चेत आले होते. राज्यसभेची निवडणूक अटीतटीची असल्याने सर्वच पक्षांसाठी एक एक मत महत्त्वाचे होते. त्यामुळे भाजपने राज ठाकरे यांचं मन वळवून मनसेचं एक मत आपल्याकडे वळवलं होतं. मात्र काही वेळापूर्वीच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना मनसे आमदार राजू पाटील यांनी विधान परिषदेच्या मतदानाबाबत सस्पेन्स निर्माण केला आहे. आम्हाला कोणी गृहीत धरू नये. आम्ही भाजपला मतदान करणार आहोत की दुसऱ्या पक्षाला मतदान करणार आहोत, हा आमचा प्रश्न आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जे आदेश येतील. तिथेच आमचं मतदान होईल. त्यामुळे आम्हाला कोणीही गृहित धरू नये, असे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर राजू पाटील हे विधान परिषदेच्या मतदानासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
राज ठाकरे रुग्णालयात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हिपबोनवर शस्त्रक्रिया असल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मतदान संपायला अवघे दोन तास बाकी आहेत. त्याचवेळी पाटील यांनी गृहित धरू नये असं सांगितल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राज ठाकरे हे रुग्णालयात असल्याने अशावेळी त्यांना फोन करणे किंवा त्यांना भेटणेही शक्य नाही. त्यामुळे भाजपची धावपळ उडाली आहे.
पाटील कुणाला मतदान करणार?
दरम्यान, राजू पाटील यांना राज ठाकरे यांचा फोन येऊ शकतो असं सांगितलं जात आहे. दोन तासात राज ठाकरे यांच्याशी पाटील यांचा संपर्क होऊ शकतो. त्यानंतर राज यांच्या आदेशाने ते मतदान करतील. राज यांच्याशी संपर्क न झाल्यास पाटील हे कुणाला मतदान करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शेलार संपर्काच्या प्रयत्नात?
राज्यसभा निवडणुकीच्यावेळी आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यांच्याकडे मत देण्याची विनंती केली होती. त्यानंतर मनसेने भाजपला मतदान केलं. पण यावेळी राज ठाकरे यांच्याकडे कुणीच फिरकलेलं नाही. राज्यसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाल्यानंतरही भाजपकडून कोणीच राज यांच्याशी संपर्क साधून त्यांचे आभार मानले नसल्याचं सांगितलं जात आहे. आता पुन्हा मनसेचं मत मिळावं म्हणून शेलार हे राज ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे.