कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी निर्बंधांचे पालन करा, पालकमंत्री एकनाथ शिंदेंचे ठाणेकरांना आवाहन
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची सर्वांधिक गरज भासली. उत्पादनापेक्षा मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता मात्र परिस्थिती नियंत्रणात येत आहे.
ठाणे : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गोकुळाष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत ‘आरोग्य उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत ‘संस्कृती प्रतिष्ठान’च्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता ‘आरोग्य उत्सव’ आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज ठाणे शहरातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. (Follow restrictions to prevent a possible third wave of corona, Eknath Shinde appeals to citizens)
या कार्यक्रमावेळी कार्यक्रमास नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आमदार सरनाईक यांच्या वतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी मीरा भाईंदर येथे पहिल्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तर आज ठाण्यातील प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची सर्वांधिक गरज भासली. उत्पादनापेक्षा मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता मात्र जिल्हा नियोजन विकास निधी आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगर परिसरातील महापालिकांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे पीएसए प्लांट उभारले आहेत. त्यामाध्यमातून गरजू रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यासाठी मदत होईल. सध्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत असल्याचे सांगत संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
तसेच कोरोनाकाळात जीव गमावलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कुटूंबियांना यावेळी आर्थिक मदत करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाण्यातील या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 31, 2021
हे काही स्वातंत्र्य युद्ध नाही
या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे नियम मोडून दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मनसे आणि भाजपवर टीका केली. कोरोनाचे नियम मोडून आम्ही करून दाखवलं असं सांगायला हे काही स्वातंत्र्य युद्ध नाहीये. हे काही स्वातंत्र्य मिळून दाखवलं नाही. त्यासाठी आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा. कोरोनाचे नियम सरकारने का घालून दिले आहेत? याचा थोडा तरी विचार करायला पाहिजे ना. निर्बंधांना विरोध करायला फुकट कोरोना वाटप करण्याचा हा काही सरकारी कार्यक्रम नाहीये, अशी टीका त्यांनी मनसे आणि भाजपचे नाव न घेता केली.
खुमखुमी असेल तर कोरोनाविरोधात आंदोलन करा
तिसरी लाट येऊ शकते. त्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहे. केंद्राने पत्रं दिलं आहे. त्यात त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सवात निर्बंध पाळा असं म्हटलं आहे. त्यामुळे कोणतंही सरकार कोणत्याही सणांविरोधात नाहीये. आपण कोरोना विरोधात आहोत. त्यामुळे आंदोलन करण्याची ज्यांना खुमखुमी आहे. त्यांनी कोरोनाविरोधात आंदोलन करावं. प्रतापने जे आंदोलन केलं ते कोरोनाविरोधातील आंदोलन आहे, असं त्यांनी सांगितलं. कोरोनाविरोधात आंदोलन करण्याची यांची हिंमत नाही, कुवत नाही. विचार नाही आणि तेवढी प्रगल्भताही नाही. त्यांना रस्त्यावर उतरून गोंधळ घालायचा आहे. आणि शिस्त पाळणाऱ्या लोकांचा जीव धोक्यात घालायचा आहे. हे लोक बेजबाबदारपणे वागत आहे. त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. मला मात्र माझ्या शिवसैनिकांचा सार्थ अभिमान आहे, असंही ते म्हणाले.
इतर बातम्या
बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत, कामातून आशीर्वाद मिळतात; मुख्यमंत्र्यांचा राणेंना नाव न घेता टोला
मनाई आदेश झुगारून मनसेने दहीहंडी फोडली; नांदगावकरांसह मुंबई, ठाण्यातील मनसैनिकांची पोलिसांकडून धरपकड
(Follow restrictions to prevent a possible third wave of corona, Eknath Shinde appeals to citizens)