ठाण्यात बाप्पाला निरोप… विसर्जन स्थळांवर गर्दी; पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त

| Updated on: Sep 19, 2021 | 2:32 PM

कुठे ढोलताशांचा गजर... तर कुठे गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा... तर कुठे शांततेत मोजक्याच लोकांनी काढलेल्या मिरवणुका... अशा उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्यात आला. (Ganpati Visarjan: Devotees Bid Farewell to Lord Ganesha in thane)

ठाण्यात बाप्पाला निरोप... विसर्जन स्थळांवर गर्दी; पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त
Ganpati Visarjan
Follow us on

ठाणे: कुठे ढोलताशांचा गजर… तर कुठे गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा… तर कुठे शांततेत मोजक्याच लोकांनी काढलेल्या मिरवणुका… अशा उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी विसर्जन स्थळावर मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण ठाण्यात नाक्या नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (Ganpati Visarjan: Devotees Bid Farewell to Lord Ganesha in thane)

करोणाच्या सावटात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश भक्त बापाला निरोप देत आहेत. कोरोनाचं संकट असल्यामुळे राज्य सरकार आणि महापालिकेच्या नियमावलीच पालन करतच घरगुती आणि सार्वजनिक गणपती बाप्पाचे विसर्जन होतं. आज सकाळी भाविकांनी गणरायाची आरती घेऊन मनोभावे पूजा केली. त्यानंतर जड अंतकरणाने भाविकांनी बाप्पाला निरोप दिला. ढोलताशे वाजवून आणि मोरया मोरयाचा गजर करत बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी संपूर्ण ठाण्यात चार हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ठाण्यातील कृत्रीम तलावांची व्यवस्था

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवसाच्या सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्था तयार केली आहे. या व्यवस्थेतंर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, निळकंठ वुड्स टिकुजीनी वाडी-बाळकुम रेवाळे, खारेगाव आदी ठिकाणी एकूण 13 कृत्रीम तलावांची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे.

तर पारसिक रेतीबंदर विसर्जन महाघाट अणि कोलशेत महाघाट याबरोबरच मिठबंदर, कळवा, गायमुख येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावरही गणेशमूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे.

वसई-विरारमध्ये विसर्जन सुरू

वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात आज 11 दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनासाठी पालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पालिकेच्या 9 प्रभागातील 44 विसर्जन स्थळावर 20 हजार 555 सार्वजनिक आणि घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे. नालासोपाऱ्याच्या तुलिंज विभागात सर्वाधिक 8 हजार 655 बाप्पाचे विसर्जन आज होणार आहे. विसर्जनच्या वेळी गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक गणेशभक्तांनी आपल्या मंडळात, किंवा घरीच आरती घेऊन, विसर्जन स्थळावर जायचे आहे. मूर्तीसोबत फक्त चारच गणेशभक्तांना विसर्जनस्थळावर प्रवेश दिला जाणार आहे. रात्री 8 वाजेपर्यंतच विसर्जन करणे सर्वांवर बंधनकारक आहे.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

वसई, विरार आणि नालासोपारा परिसरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी 450 पोलीस अधिकारी आणि 1 हजार 750 पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. तसेच वाहतूक शाखा, होमगार्ड, दंगलनियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दलही तैनात ठेवण्यात आलं आहे. विसर्जन तलाव, मोक्याचे नाके, वाहतूक कोंडी होणारे परिसर, तसेच नाकाबंदी करण्यासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व गणेश भक्तांनी शासनाचे सर्व नियम पाळून बाप्पाना भक्तिमय वातावरणात निरोप द्यावा, असे अहवान प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Ganpati Visarjan: Devotees Bid Farewell to Lord Ganesha in thane)

 

संबंधित बातम्या:

Ganesh Visarjan 2021 Live Update | लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

निफाडमध्ये तुरटीच्या गणपतीचं विसर्जन, येवल्यात साध्या पद्धतीने बाप्पाला निरोप, मनमाडमध्ये कडक निर्बंधामुळे भक्तांचा हिरमोड

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरून दरमहा किती कमाई?; नितीन गडकरी म्हणतात…

(Ganpati Visarjan: Devotees Bid Farewell to Lord Ganesha in thane)