बापरे! महापालिका उपायुक्ताला तब्बल इतके पैसे जायचे? जितेंद्र आव्हाड यांचा सर्वात गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) यांच्यावर अतिशय गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) यांच्यावर अतिशय गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आहेर हे प्रत्येक स्क्वेअर फूटमागे 200 रुपये घेतात. एकट्या दिव्यात 5 लाख स्क्वेअर फूटचं काम सुरुय. त्यामुळे पैसे किती होतील याचा विचार करा, असा धक्कादायक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. जितेंद्र आव्हाड आणि महेश आहेर यांच्यातील वादामागे एक कथित ऑडिओ क्लिप हे कारण आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये आव्हाडांची मुलगी आणि जावायाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या क्लिपमधला आवाज महेश आहेर यांचा असल्याचा आरोप आहे. त्यावरुनच आव्हाड रागावले आहेत.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महेश आहेर यांना मारहाण देखील केलीय. त्यामुळे आहेर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांकडून आहेर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय. पण पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप आव्हाड कुटुंबियांनी केला. आव्हाड यांनी मुलगी नताशासोबत पत्रकार परिषद घेऊन याबाबत भूमिका मांडली.
जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
“महेश आहेरच्या ऑफिसमध्ये एवढे गठ्ठेच्या गठ्ठे पोहोचतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. लोकांनी त्यांच्या डिग्रीबद्दल प्रश्न विचारले आहेत. हा कुणाचा जावई आहे? शिक्षणात फेरफार, त्याला प्रमोशन कसं दिलं? हा सगळ्या महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांचा बाप, २०० रुपये स्क्वेअर फूटप्रमाणे हिशोब जायचा”, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
“एकट्या दिव्यात ५ लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम सुरु आहे. त्याचे २०० रुपये प्रमाणे पकडा. तो बरोबर बोलतो. माझ्याकडे दररोज ४० लाख येतात २० लाख वाटतो. आम्ही नाही बोलत तर तोच बोलतोय. तो त्याचा आवाज नाही, असा फॉरेन्सिक रिपोर्ट येईल. कारण आम्हाला माहिती आहे की, सत्तेत कोण बसलं आहे. अरे हाच लोकांवर गुन्हे दाखल करतो? नऊ-नऊ गुन्हे दाखल करतो आणि मागे घेतो”, अशी टीका त्यांनी केली.
“बाबाजी हा कोण आहे? हा बाबाजी एकेकाळचा दाऊदचा शूटर होता. मुंबईतलं सर्वात मोठं हत्याकांड होतं. जे जे हॉस्पिटलमध्ये घुसून त्याने कुणालातरी मारलं होतं. त्याच्या नावावर 50 गुन्हे होते. इतक्या उघडपणे तो नाव घेतो. त्याचा पुरावा म्हणजे विक्रांत चव्हाण आहे ना! विक्रांत चव्हाणला घाटकोपरला बोलवून दम दिला जातो आणि शांत केलं जातं. तुमच्याकडे त्याच्या कारवाईचा एक पुरावा उपलब्ध आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“आपण पोलीस काय कारवाई करतात तेच बघायचं आहे. कारण आपण पोलिसांना आदेश द्यायला सत्तेत नाहीत. माझा काय संबंध? कलम 307 लावता कसे? त्यामध्ये काय आहे? साधं रक्तही आलेलं नाही. रिव्हॉल्वर दिसली का? पोलिसांनी खोटं किती करायचं? हे कुणाच्या सांगण्यावरुन तसं होतंय? दोन-दोन महिन्यात जितेंद्र आव्हाडला केसमध्ये अडकवायचे प्रयत्न सुरु आहेत. कशासाठी? इनकम टॅक्स, जीएसटी, असे वेगवेगळे निरोप पाठवायचे”, असं जितेंद्र आव्हाड संतापात म्हणाले.