Tembhi Naka navratri: मुख्यमंत्र्यांकडून टेंभी नाक्यावर देवीच दर्शन, आई जगदंबेचरणी केली एकच प्रार्थना…
Tembhi Naka navratri: मुख्यमंत्र्यांनी टेंभी नाक्यावरील देवीकडे काय मागितलं?
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज टेंभी नाक्यावरील देवीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री सहकुटुंब देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी इथे पूजा केली. टेंभी नाक्यावरील हा नवरात्रौत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी टेंभी नाक्यावर नवरात्रौत्सवाची सुरुवात केली होती. काल याच ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आल्या होत्या.
उत्सवाची ख्याती देश-विदेशात
रश्मी ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या होत्या. त्यांनी या देवीची आरती केली होती. आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब देवीच दर्शन घेतलं. “टेंभी नाक्यावरच्या उत्सवाची ख्याती देश-विदेशात पोहोचलेली आहे. लाखो लोक टेंभी नाक्यावर देवीच्या दर्शनासाठी येत असतात. या देवीची सेवा करतच मी मुख्यमंत्री झालो” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
कुठल्या नेत्यांनी घेतलय टेंभी नाक्यावरील देवीच दर्शन
“टेंभी नाक्यावर नवरात्रौत्सव ही अनेक वर्षांची परंपरा आहे. या देवीचं महात्मय सर्वांना माहित आहे. लोक भक्तीभावाने येथे दर्शनासाठी येत असतात” असं मुख्यमंत्री म्हणाले. “वेगवेगळ्या दिग्गज नेत्यांनी टेंभीनाक्यावर येऊन देवीचं दर्शन घेतलय. यात हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून लालकृष्ण आडवणी सुद्धा आहेत” असं मुख्यमंत्री म्हणाले.
देवी चरणी काय प्रार्थना केली?
“देवीची सेवा करतच मी मुख्यमंत्री झालो. देवीचा आशीर्वाद सगळ्यांवरच आहे. राज्यातील जनतेवरील संकट, अरिष्ट दूर होवो. रोगराई दूर होऊन राज्यातल्या सर्व लोकांच्या जीवनात बदल घडूं दे. सुख, समृद्धी, ऐश्वर्य समाधान लाभूं दे. राज्य सुजलाम, सुफलाम होऊं दे हीच प्रार्थना देवीचरणी केली” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितंल.