Eknath Shinde | वाहतूक पोलिसांच्या अतिउत्साहामुळे मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाची नाहक बदनामी, श्रीकांत शिंदेंनी विचारला जाब
Eknath Shinde | निर्णयाची शिंदे कुटुंबालाच नव्हती माहिती. त्यामुळे प्रसिध्दी माध्यमं आणि सोशल मीडीयावर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला ट्रोल करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सध्या मराठा आरक्षण आंदोलन हाताळण्याच आव्हान आहे. राज्यात या विषयावरुन वातावरण तापलं आहे.
ठाणे : ठाणे वागळे इस्टेट लुईसवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ घर आहे. तिथे एकनाथ शिंदे यांचा शुभदीप बंगला आहे. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे तिथे कुटुंबीयांसह राहतात. याच ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या घराकडे जाणाऱ्या एका सर्विस रोडवरुन वाद निर्माण झाला आहे. ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने हा सर्विस रोड बंद करण्यासाठी एक अधिसूचना काढली होती. पण त्याची शिंदे कुटुंबाला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. त्यामुळे प्रसिध्दी माध्यमं आणि सोशल मीडीयावर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला ट्रोल करण्यात आलं. त्यावरुन आता श्रीकांत शिंदे ठाणे पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे. “आमच्या निवासस्थान परिसरातील वाहतूकीत बदल करण्याबाबत कोणतीही विनंती किंवा सूचना मी किंवा आमच्या कुटुंबियांनी केलेली नव्हती, तसेच अशा पद्धतीने पत्रक जारी करण्यापूर्वी आम्हाला पूर्वकल्पनाही देण्यात आली नव्हती” असं श्रीकातं शिंदे यांनी पत्रात म्हटलं आहे.
“वाहतूक विभागाचे अतिउत्साही पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी परस्पर काढलेल्या या पत्रामुळे प्रसिध्दी माध्यमे आणि सोशल मीडीयावर आमच्या कुटुंबियांची नाहक बदनामी केली जात आहे. चूक पोलिसांची आणि खापर आमच्या माथी अशी अत्यंत संतापजनक परिस्थिती त्यामुळे उद्भवली आहे. आमचे येणे- जाणे सुकर व्हावे यासाठी सर्वसामान्य जनतेचा रस्ता अडविण्याचा अधिकार आम्हाला मुळीच नाही. ते व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही” असं श्रीकांत शिंदे यांनी पत्रात स्पष्ट म्हटलं आहे. “सुरक्षेच्या कारणास्तव अशा पद्धतीने वाहतूक बदल करून ठाणेकरांना त्रास होत असेल तर पोलिसांचे हे प्रयत्नही अनाकलनीय आहे. लोकांचे दैनंदिन जगणे सुसह्य करणे हे लोकप्रतिनिधींचे आणि पोलिसांचेही कर्तव्य असते. त्यांच्या जगण्यात अडथळे निर्माण करणे आपल्याला निश्चितच शोभणारे नाही. आमची सुरक्षेसाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेतोय. परंतु, पोलिसांनी उत्साहाच्या भरात अशा पद्धतीने वाहतूक बदल करण्याचा जो प्रताप केला आहे तो निश्चितच योग्य नाही” असं श्रीकातं शिंदे यांनी म्हटलय.
पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी?
“पोलिसांच्या या पत्रकबाजीमुळे आमच्या कुटुंबियांना जो मनस्ताप सहन करावा लागलाय याची कल्पना पत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांना कदाचीत नसावी. त्यामुळे आम्हाला कोणतीही कल्पना नसताना परस्पर अशा पद्धतीने वाहतूक बदलाचे परिपत्रक काढणारे पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्यावर आपण तातडीने कठोर कारवाई करावी. तसेच, यापुढे अशा पद्धतीने कोणतेही परिपत्रक काढले जाणार नाही याबाबतची समज संबंधित अधिकाऱ्यांना आपण द्यावी” अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी केलीय.