Kalyan Garbage Issue : कल्याणात कचरा प्रश्न पेटला, …अन्यथा गाड्या जाळून टाकू; मनसेचा इशारा
कल्याण पश्चिमेडील बारावे येथे महापालिकेचा कचरा प्रक्रिया व वर्गीकरण प्रकल्प आहे. तीन महिन्यापूर्वी कचरा प्रकल्पाला आग लागल्याने या प्रकल्पातील मशिनरी बंद पडली होती. कचरा प्रक्रिया ठप्प असूनही या ठिकाणी कचरा आणला जात होता.
कल्याण : कल्याण डोंबिवलीत कचरा (Garbage) प्रश्न पु्न्हा एकदा पेटला आहे. कल्याण पश्चिमेकडील बारावे प्रकल्प (Barave Project) पुन्हा वादात अडकला आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. या प्रकल्पातील मशिनरी बंद आहेत. तरीही या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. या प्रकल्पाला डम्पिंग ग्राऊंड (Dumping Ground)चं स्वरूप प्राप्त झालंत. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे जोपर्यंत मशिनरी सुरू होत नाही, तोपर्यंत कचरा गाड्यांना विरोध राहील असा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. गाड्या आल्या तर आम्ही जाळून टाकू, असा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांना कल्याण शहर मनसेने पाठिंबा दिला आहे.
तीन महिन्यांपूर्वी कचरा डेपोला लागली होती आग
कल्याण पश्चिमेडील बारावे येथे महापालिकेचा कचरा प्रक्रिया व वर्गीकरण प्रकल्प आहे. तीन महिन्यापूर्वी कचरा प्रकल्पाला आग लागल्याने या प्रकल्पातील मशिनरी बंद पडली होती. कचरा प्रक्रिया ठप्प असूनही या ठिकाणी कचरा आणला जात होता. केडीएमसीला वारंवार तक्रार करूनही काही फरक पडत नसल्याने संतप्त नागरिक आज प्रकल्पाच्या ठिकाणी एकत्र जमले. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. प्रकल्प बंद करा, बंद पडलेली मशिनरी तात्काळ सुरू करा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
अंबरनाथच्या डम्पिंगचीही मनसे आमदार पाहणी करणार
अंबरनाथच्या मोरीवली पाड्याजवळ असलेलं अनधिकृत डम्पिंग बंद करून पालिकेनं वर्षभरापूर्वी चिखलोली परिसरातील आरक्षित भूखंडावर कचरा टाकायला सुरुवात केली. मात्र या कचऱ्यामुळे येथील रहिवाशांना मोठा त्रास होतोय. पावसामुळे डम्पिंगमधून निघणारं घाण पाणी थेट इमारतींच्या बोअरवेलमध्ये जात असल्याने दुर्गंधीसोबतच आजारही पसरले आहेत. याबाबत स्थानिकांनी पालिकेकडे तक्रारी करूनही काहीच तोडगा निघत नसल्यानं स्थानिकांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली होती. त्यानंतर हरित लवादाने या डम्पिंगची पाहणी केली होती. आता थेट मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या समस्येची दखल घेतली आहे. येत्या 2-3 दिवसात या डम्पिंगची आपण पाहणी करणार असल्याचं राजू पाटील यांनी जाहीर केलंय.