मविआ सरकार आल्यापासून महाराष्ट्राला पणवती, दहीहंडीवरुन मनसेची आक्रमक भूमिका
दहीहंडी हा उत्सव कोविड काळात होणार नाही असा निर्णय घेणारे हे कोण? असा सवाल मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे.
ठाणे: महाविकास आघाडी सरकार आल्यापासून महाराष्ट्राला पणवती लागलेली आहे. त्यामुळे आम्हाला कोणतेही कार्यक्रम साजरे करता येत नाही. दुसरीकडे आमदारांचे नातेवाईकांचे लग्न सोहळ्याचे कार्यक्रम साजरे होत आहेत. कोविड काळात सणांवर संक्रांत आणलेली आहे, ही महाराष्ट्रवर आलेली संक्रांत आहे,अशी टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे.
दहीहंडी हा उत्सव कोविड काळात होणार नाही असा निर्णय घेणारे हे कोण? असा सवाल मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश आल्यास आम्ही दहीहंडी साजरी करणार आहे.
दहीहंडी समन्वय समिती बैठकीत मनसे नेते बाळा नांदगावकर यांना देखील बोलू दिले गेले नाही. जागतिक रेकॉर्ड करणाऱ्या पथकाला देखील या समन्वय समिती च्या बैठकीत आमंत्रण दिले गेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो निर्णय घेतला आहे त्या बाबत मनसेच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलं?
दहीहंडी सण थाटामाटात साजरा करण्यायासाठी शासनाने परवानगी द्यावी नाहीतर आम्ही आंदोलन करु, अशी आक्रमक भूमिका दही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विरोधी पक्ष भाजपने घेतली. त्यावर जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण -वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा, अशी संयमी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली.
सणांसंबंधी आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजेत… पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारच प्राधान्यांना करावा लागेल, असं म्हणत एकप्रकारे दहीहंडी साजरा करण्यावर निर्बंध असतील किंबहुना दहीहंडीसाठी परवानगी नसेल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींच्या मुख्यमंत्र्यांकडे 5 मागण्या
1) आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी मिळावी. 2) दहीहंडी फोडताना मानवी मनोरे उभारण्यासाठी सर्व गोविदांचे दोन्ही लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. तशी तयारी गोविंदा पथकांनी केली आहे. 3) गोविंदा पथक हे दुसरीकडे कोठेही दहीहंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत. 4) कोविड १९ संसर्गाची जाणिव ठेवुनच सुरक्षित दहीहंडी उत्सव आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची परवानगी द्यावी. 5) दहीहंडी फोडताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी गोविंदा मंडळं घेतील.
इतर बातम्या:
Dahi Handi : जीव वाचवण्यासाठी सण-वार काही काळ बाजूला ठेवू, मुख्यमंत्र्यांचं गोविंदा पथकांना आवाहन
आमच्या पक्षातील ‘या’ नेत्याला मंत्रिमंडळातून काढा, काँग्रेस नेत्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
MNS Leader slam MVA Government over permission of Dahihandi Festival