कोरोनापेक्षा जास्त प्राणघातक असलेल्या म्युकोरमायकोसिसचा राज्यात पहिला बळी; डोंबिवलीत वृद्धाचा मृत्यू
आतापर्यंत केवळ ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांना म्युकोरमायकोसिसची लागण होताना दिसत होती. | mucormycosis
ठाणे: कोरोनाइतकेच मोठे संकट ठरण्याची शक्यता असलेल्या म्युकोरमायकोसिस (mucormycosis) या आजाराने आता ग्रामीण भागातून शहरी भागात शिरकाव केला आहे. ठाणे आणि डोंबिवलीमध्ये म्युकोरमायकोसिसचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी म्युकोरमायकोसिसची लागण झालेल्या डोंबिवलीतील वृद्धाचा मृत्यू झाला आहे. राज्यात म्युकोरमायकोसिसमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. (Mucormycosis first death in Maharashtra old man died in Dombivli)
मृत व्यक्तीचे नाव बाजीराव काटकर असून ते 69 वर्षांचे होते. डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात म्युकोरमायकोसिसची लागण झालेल्या सात रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे समजते. रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भात अधिकृतरित्या काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाजीराव काटकर यांचा मृत्यू झाल्याची बाब डॉक्टरांनी खासगीत मान्य केली आहे.
ही घटना राज्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. आतापर्यंत केवळ ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांना म्युकोरमायकोसिसची लागण होताना दिसत होती. मात्र, आता हा रोग शहरी भागांमध्येही हातपाय पसरायला लागला आहे. नुकतीच ठाण्यातही एका महिलेला या रोगाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
म्युकोरमायकोसिसचा हा आजार इतका गंभीर आहे की, रुग्णाच्या जगण्याची शक्यता केवळ 50 टक्के इतकी असते. तसेच यामुळे अंधत्त्व आणि इतर गंभीर व्याधी उद्धवू शकतात. रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता म्युकोरमायकोसिस साथीच्या आजाराप्रमाणेही फैलावू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आतापासूनच म्युकोरमायकोसिसच्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. ही औषधेही प्रचंड महाग आहेत. त्यामुळे म्युकोरमायकोसिसचा वाढता संसर्ग राज्यासाठी नव्या संकटाची चाहुल मानली जात आहे.
म्युकोरमायकोसिस म्हणजे काय?
म्युकोरमायकोसिस एक दुर्मीळ फंगल इंफेक्शन आहे, याला झिगॉमायकोसिसदेखील म्हणतात. यात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेह असलेल्या नागरिकांना हा आजार होत आहे. वेळेत उपचार घेतल्यास हा आजार लवकर बरा होऊ शकतो. यामुळे तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, सायनस रक्तसंचय, तोंडाच्या वरच्या भागात ताप येणे ही लक्षणे आहेत
म्युकरमाक्रोसिस हा नवीन आजार नाही. मात्र कोरोना नसताना वर्षा-दोन वर्षातून एखादी केस पाहायला मिळायची. याचं प्रमाण देशभरात पाहायला मिळत होतं. दोन लाटांमध्ये हा फरक दिसत आहे. पहिल्या कोरोना लाटेत फार रुग्ण नव्हते, पण दुसऱ्या लाटेत चकित करणारे प्रमाण दिसत आहे.
या आजाराचे सायनसमधून संक्रमण सुरू होते. पुढे ते तोंडाच्या आतून वरचा जबडा, डोळा आणि मेंदूपर्यंत पोहोचते. डोळा कायमचा निकामी होतो. पॅरालिसिस आणि मृत्यूही यात ओढावण्याची शक्यता असते.
संबंधित बातम्या:
सावधान, धोका वाढतोय; ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचा झपाट्याने संसर्ग, नव्या संकटाची चाहुल?
(Mucormycosis first death in Maharashtra old man died in Dombivli)