“ते विकले गेलेले नाहीत का?,” नरेश म्हस्के यांचे उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर
सुषमा अंधारे या राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आलेल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक लोकं ते घेत आहेत. ते आपल्यात पूर्णकर्म म्हणून येत आहेत का, असा सवाल नरेश म्हस्के यांनी केला.
ठाणे : लवकरचं ठाण्यात सभा घेऊन समाचार घेणार असा इशारा उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात दिला. यावरून शिंदे गटावर त्यांनी थेट निशाणा साधला. ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घेण्यासाठी लवकरचं सभा घेणार असं, उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं. एका गोष्टीचं समाधान आहे. सध्या राजकारणात काही गलिच्छपणा आला आहे. तो समोर दिसत आहे. पण, शिवसेना मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही. ठाण्यात येणाऱ्या दिवसात एक सभा घेणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्रात निष्ठेच्या पांघरूनाखाली काही लांडगे लपले गेलेत, ते विकले गेलेत. यामुळं महाराष्ट्राची, शिवसेनेची बदनामी झाली, अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून डागली.
गेले ते जाऊ द्या. त्यांच्याबद्दल काही दुःख व्यक्त करण्यात अर्थ नाही. पण, अस्सल निखाऱ्यासारखे धडधगते शिवसैनिक शिवसेनेसोबत आणि माझ्यासोबत आहेत. हे निखारे उद्या राजकारणात मशाल पेटविणार आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.
अहीर, अंधारे विकले गेले नाहीत का?
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिला. सचिन अहीर, सुषमा अंधारे या ठाकरे गटात आल्या. मग त्या विकल्या गेल्या नाहीत का. नरेश म्हस्के यांनी हा सवाल विचारला. नरेश म्हस्के म्हणाले, जे सोडून गेले ते विकले गेले. यांच्याकडं सचिन अहीर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आलेले आहेत.
प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर सदस्य आहेत. त्या काँग्रेसमधून आलेल्या आहेत. सुषमा अंधारे या राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आलेल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक लोकं ते घेत आहेत. ते आपल्यात पूर्णकर्म म्हणून येत आहेत का, असा सवाल नरेश म्हस्के यांनी केला.
दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं
ते पण दुसरा पक्ष सोडून आपल्यात येत आहेत. ते विकले गेलेले नाहीत का? दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. पण, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. सध्या ही परिस्थिती आहे, असा घणाघात नरेश म्हस्के यांनी केला.