…तर टोल न आकारता गाड्या अशाच सोडाव्या लागतील, सरकारचा मोठा निर्णय
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल नाक्यांवर होणाऱ्या कोंडीतून आता वाहनचालकांची सुटका होणार आहे (National Highways Authority of India new guidelines for toll naka).
ठाणे : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल नाक्यांवर होणाऱ्या कोंडीतून आता वाहनचालकांची सुटका होणार आहे. टोल नाक्यांवर 100 मीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या असतील, तर टोल न आकारताच वाहनांना पुढे पाठवण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातील टोल नाक्यांसाठी नवीन मागर्दशक तत्त्वे आखली आहेत (National Highways Authority of India new guidelines for toll naka).
…तोपर्यंत चालकांकडून टोल घेतला जाणार नाही
या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी टोल नाक्यांवर 100 मीटरपर्यंत पिवळी रेषा आखली जाणार असल्याची माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली. जोपर्यंत वाहनांची रांग 100 मीटरपेक्षा कमी होत नाही, तोपर्यंत त्या चालकांकडून टोल घेतला जाणार नाही, असे मार्गदर्शक तत्त्वात नमूद केले आहे. त्यामुळे आता टोलधारक जर या नियमांचे अंमलबजावणी करणार नसेल तर त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तर आता याबाबत टोलधारक नियमावलीचे पालन कशाप्रकारे करणार, हे पाहावे लागणार आहे (National Highways Authority of India new guidelines for toll naka).
नवीन नियमाने वाहतूक कोंडी दूर होईल का?
टोल नाक्यांवर 100 मीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागू नये यासाठी आधी देखील मुलुंड टोल नाक्यावर पिवळा पट्टा आखण्यात आला होता. मात्र, तेथील प्रशासन त्याचे काहीही नियम पाळताना दिसत नसल्याचे आतादेखील दिसून येत आहे. दुसरीकडे टोल नाक्यावर फास्ट टॅगची संकल्पना असली तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. तर आता या नवीन नियमाने वाहतूक कोंडी दूर होईल का? हेच पाहणे गरजेचे आहे.
‘वाहनाला दहा सेकंदापेक्षा अधिक थांबावे लागू नये’
राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आल्यानंतर टोलची रक्कम ऑनलाईनच घेतली जाते. फास्ट टॅगमार्फत टोल घेताना प्रवाशांचा झटपट प्रवास होईल, अशी आशा प्राधिकरणाला होती. परंतू, काही टोल नाक्यांवर टोल घेताना तांत्रिक कारणास्तव बराच वेळ जातो. त्यामुळे चालकांना मोठा मनस्ताप होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राधिकरणाकडे येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर चालकांना होणारा मनस्ताप पाहता नवीन मागदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत. गर्दीच्या वेळी प्रत्येक वाहनाला दहा सेकंदापेक्षा अधिक थांबावे लागू नये, असे उद्दिष्ट ठेवून नवीन मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत, असे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा : कल्याणमध्ये काटई टोलनाका बंद, शिवसेना-मनसेत श्रेयवाद, राज्य सरकारने नेमका टोलनाका बंद का केला?