इंडिया आघाडीत फूट पडणार? नितीशकुमार कधीही एनडीएत येणार; रामदास आठवले यांचा मोठा दावा
महात्मा गांधींबाबतचं विधान संभाजी भिडे यांच्या वयाला शोभत नाही. संभाजी भिडे हे सांगली जिल्ह्यामध्ये राहणारे आहेत. ते अनेक वेळेला आपल्या पद्धतीने भूमिका मांडतात.
उल्हासनगर | 31 जुलै 2023 : केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार कधीही एनडीएमध्ये येऊ शकतात, असं विधानच रामदास आठवले यांनी केलं आहे. नितीशकुमार हे एनडीएमध्येच होते. गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतरही त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. त्यामुळे ते कधीही एनडीएत येऊ शकतात, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
मी काल पाटण्यात होतो. त्यावेळी मला नितीश कुमार यांची कथित नाराजी आणि विरोधी पक्षाच्या बैठकीतून नितीशकुमार लवकर निघून गेल्याबाबत मला विचारण्यात आलं. त्यावर मी नितीश कुमार हे खूश नसतील तर त्यांनी मुंबईला जाऊ नये असं म्हटलं. ते पूर्वी एनडीएसोबतच होते. कधीही आमच्याकडे येऊ शकतात, असं रामदास आठवले म्हणाले.
फक्त मोदींना हटवणं हाच अजेंडा
यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. या आघाडीचं एकमेव टार्गेट म्हणजे मोदींना सत्तेतून हटवणं आहे. नितीश कुमार यांचा इंडिया नावाला आक्षेप होता. तसेच या आघाडीचे संयोजक कोण असेल आणि पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल यावरूनही या आघाडीत मतभेद आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
इंडिया म्हणजे भारत नाही
विरोधकांनी त्यांच्या आघाडीला इंडिया नाव दिल्याने तो भारत देश होऊ शकत नाही. त्यांची आघाडी म्हणजे डेड अलायन्स आहे. विरोधक एकत्र आल्याने एनडीएला काहीच फरक पडणार नाही. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. एनडीएला 350 जागा मिळतील. कारण देश एनडीएच्यासोबत आहे, असा दावा त्यांनी केला.
मोदी-पवार चर्चा होऊ शकते
1 ऑगस्ट रोजी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र आहेत. दोघांमध्ये चर्चा होईल. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोदी आणि शरद पवार यांच्यात चर्चा होईल असं मला वाटतं, असंही ते म्हणाले.
भिडेंवर कारवाई करा
महात्मा गांधींबाबतचं विधान संभाजी भिडे यांच्या वयाला शोभत नाही. संभाजी भिडे हे सांगली जिल्ह्यामध्ये राहणारे आहेत. ते अनेक वेळेला आपल्या पद्धतीने भूमिका मांडतात. त्यामुळे जनतेच्या भावना दुखवतात. महात्मा गांधी हे स्वातंत्र्य सेनानी होते. इंग्रजांच्या काळात त्यांनी चांगल्या प्रकारे लढा उभारला होता. गांधींच्या विरोधात असं वक्तव्य करणं त्यांच्या वयाला शोभत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे विधान करणाऱ्या भिडेंवर देवेंद्र फडवणीस यांनी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.