‘काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात’, मुख्यमंत्र्यांचा रोख नेमका कोणावर
CM Eknath Shinde | ऐन दिवाळीच्या पावन पर्वावर ठाण्यात एका शाखेचा वाद पेटला. त्यामुळे मुंबईसह ठाण्यात वातावरण तापले. मुंब्रामधील शाखा पाडल्याचा वाद चिघळला. संध्याकाळी हायहोल्टेज ड्रामा रंगला. तो थोड्यावेळाने निवळला. या सर्व परिस्थितीवर आज सकाळी मुख्यमंत्र्य एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केले आहे.
ठाणे | 12 नोव्हेंबर 2023 : काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केले. अर्थात मुख्यमंत्र्यांचा रोख कुणावर होता हे वेगळं सांगायची गरज नाही. ठाणे येथे आज सकाळी दिवाळी पहाट कार्यक्रमात त्यांनी मोजक्याच शब्दात घडामोडींचा समाचार घेतला. दिवाळीत मुंब्रा येथील पाडलेल्या शाखेतून शिवसेनेतील दोन्ही गटांनी वादाचा मुहूर्त गाठला. शनिवारी मुंब्रामध्ये हायहोल्टेज ड्रामा घडला. उभा महाराष्ट्र त्याचा साक्षीदार झाला. संध्याकाळी यशस्वी मध्यस्थीने पुढील वाद चिघळला नाही. मात्र आज मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य कालच्या घटनेशी सुसंगत असल्याचे दिसून आले. त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांचा रोख कालच्याच घटनेकडे तर नव्हता ना, असे अनेकांना वाटून गेले.
शाखा जमीनदोस्त
मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा गेल्या आठवड्यात अतिक्रमणाच्या आरोपाखाली जमीनदोस्त केली. शाखा पाडल्यानंतरच उद्धव ठाकरेंनी आपण मुंब्र्याला शाखेची पाहणी करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. शनिवारी ते संध्याकाळी या परिसरात पोहचले. पण तोपर्यंत अनेक घडामोडी घडल्या होत्या. पोलिसांनी अगोदर त्यांना येण्यास मनाई केली. नंतर याविषयीची नोटीस रद्द केली. त्यानंतर संध्याकाळी या परिसरात वाद शिगेला पोहचला. ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आला. या शाखा परिसात शिंदे गट ठाण मांडून बसला तर शाखेच्या हाकेच्या अंतरावर ठाकरे यांना अडवण्यात आले.
काय म्हणाले मुख्यमंत्री
‘काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात. शेवटी कुठलंही काम होणार नाही हे सांगायला काही स्किल लागत नाही. मात्र न होणारं काम सांगायला स्किल लागतं, धाडसं तर लागतंच. पण जेव्हा आपला हेतू स्पष्ट असतो, चांगला असतो त्यावेळी कधीही घाबरायचं नसतं. ज्यावेळी आपला वैयक्तिक फायदा नसतो आणि जनतेचा फायदा असतो त्यावेळी बिनधास्त करायचं असतं. मग काहीही होवो, हा माझा स्वभाव आहे. कितीही मोठं झालं तरी माणसानं आपलं मूळ विसरता कामा नये, आपली माणसं विसरता कामा नये. शेवटी पद येतात जातात. पण ज्यावेळी पद येते, त्यावेळी हजारो, लाखो माणसांच्या कामाला कशी येईल, ते पाहिलं पाहिजे.’ असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले.