बांधकामासाठी मजुरीवर गेले; मातीच्या ढिगाऱ्याखाली आल्याने कामगार अडकले
अधिकारी जबाबदार असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. दुर्लक्षितपणाने हा निष्पाप लोकांचा बळी झाला आहे. कामगारांचे कुटुंब उघड्यावर आले आहेत.
ठाणे : ठाण्यातील नौपाडा बी-केबीन येथील संतोषी माता मंदिराच्या बाजूला असणाऱ्या सत्यनिलम सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. जेसीबीने खालची माती काढण्याचे काम सुरू होते. बाजूला असलेल्या मातीचा भला मोठा ढिगारा कोसळला. त्या ढिगाऱ्याखाली 3 कामगार अडकले. ठाणे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले. काही वेळातच ढिगारा बाजूला केला. त्यावेळी त्याखाली अडकलेल्या 2 जणांना बाहेर काढले. त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. एक जण गंभीर जखमी आढळला. त्याला तात्काळ सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिलीय. हबीब आणि रणजित हे दोघे मृत्यूमुखी पडलेत. निर्मल कुमार हे गंभीर जखमी आहेत.
दुर्घटनेत दोन कामगार गेले
नौपाडा पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास नौपाडा पोलीस करत आहेत. दुसरीकडे काँग्रेसने याबाबत कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. ठाणे नौपाडा दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणी महापालिका अभियंता यांच्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. दुसरीकडे काँग्रेसने हा महापालिका प्रशासनाच्या भोंगळ आणि निष्काळजीपणामुळे झालेला प्रकार असल्याचा आरोप केला.
दोषींविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा
या दुर्घटनेत 2 निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागलाय. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. दोषी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आम्ही याविरोधात आवाज उठवू. तसेच संबंधित व्यक्तीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे.
मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी
विक्रांत चव्हाण म्हणाले, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अधिकारी जबाबदार असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. दुर्लक्षितपणाने हा निष्पाण लोकांचा बळी झाला आहे. कामगारांचे कुटुंब उघड्यावर आले आहेत. अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे होते. महापालिकेनं मृतकांच्या कुटुंबीयांना मदत केली पाहिजे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.