Raj Thackeray | राज ठाकरे यांचा थेट भाजपला इशारा, आगामी निवडणुकांमध्ये युती होणार नाहीच?
भाजप आणि मनसे यांची आगामी काळात युती होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरु लागलेली असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भाजपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजप एकत्र येईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते यांच्यात गेल्या काही दिवसांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होताना दिसत होते. असं असताना राज ठाकरे यांनी मनसेच्या सतराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाजप विषयी मोठं वक्तव्य केलं. “भारतीय जनता पक्षानेही लक्षात घेतलं पाहिजे, आज भरती चालूय, ओहटी येणार. ओहटी येऊ शकते. नैसर्गिक आहे ती गोष्ट, ती कोणी थांबवू शकत नाही”, असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय.
“हे काय आहे, हा एक प्रपोगांडा आहे. सगळेच नव्हे, पण काही पत्रकार पक्षांना बांधलेले आहेत. पत्रकारांसाठी पाकीट असतं. मग हे जाणूनबुजून अशाप्रकारचा प्रचार करतात. 2014 काय 2019 काय, नरेंद्र मोदींची लाट. त्या लाटेमध्ये मला काय विचारताय सतरा वर्षात काय? काँग्रेसला विचारा. ज्या पक्षाने संपूर्ण देशात 50-60 वर्ष राज्य केलं त्या पक्षाची अवस्था बघा”, असं राज ठाकरे म्हणाले.
“भरतीनंतर ओहटी आणि ओहटीनंतर भरती या गोष्टी होतातच. भारतीय जनता पक्षानेही लक्षात घेतलं पाहिजे, आज भरती चालूय, ओहटी येणार. ओहटी येऊ शकते. नैसर्गिक आहे ती गोष्ट, ती कोणी थांबवू शकत नाही. पण या सगळ्या कालखंडात पुढे जात असताना आजच्या परिस्थितीत आमचा राजू पाटील बघा. पक्षाची बाजू विधानसभेत एकटे मांडत आहेत. शोले चित्रपटात बोलत नाही का, एकही है मगर काफी है. संपूर्ण विधानसभा भरली तर यांचं काय होईल? पण हे जाणूनबुजून अशाप्रकारचा प्रचार केला जातो”, असं राज ठाकरे म्हणाले.
“ज्या लोकांकडून लिहिलं बोललं जातं ते समजून न घेता कुणीतरी सांगिचलेलं असतं की या प्रकारे प्रचार करा. आणि मग ते पत्रकार तशाप्रकारे प्रचार करतात आणि संभ्रम निर्माण करतात. एवढी गर्दी जमते आणि मतं जातात कुठे? आंदोलनं अर्धवट सोडतात. एक आंदोलन दाखवा अर्धवट सोडलेलं. सगळ्या जबाबदाऱ्या आमच्याच आहेत का?”, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
“जे पत्रकार आम्हाला प्रश्न विचारतात ते इथर पक्षांना विचारतात का? ज्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील 65 ते 70 टोलनाके बंद झाले. तेच अडीच वर्षापूर्वी गळ्यात गळे घालणारे शिवसेना आणि भाजप यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात दिलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करु. त्यांना एक पत्रकार प्रश्न विचारत नाही”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 17 वा वर्धापन दिवस आहे. मनसेच्या वर्धापन दिनाचा सोहळा आज पहिल्यांदाच ठाण्यात आयोजित करण्यात आला. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मनसेच्या भव्य अशा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात राज ठाकरे काय बोलतील? याकडे अनेकांचं लक्ष होतं. अखेर राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या आतापर्यंतच्या जडणघडणवर प्रतिक्रिया दिली.