राहुल गांधी यांनी इतकं करावं, मी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये काम करेल, शिंदेंच्या आमदाराचं थेट आव्हान
राहुल गांधी यांचं आडनाव खान असल्याचा दावा शिवसेना आमदाराने केला आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार शिवसेना आमदाराने घेतला आहे.
कल्याण : गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आणि शिवसेना ( Shivsena-BJP ) आक्रमक झाली आहे. राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी सावकरांवर केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप आणि शिवसेनेकडून राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. या निमित्ताने राज्यभरात सावरकर गौरव यात्रेचं आयोजन देखील केलं जात आहे.
राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप- शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्राही सुरू करण्यात आली आहे. कल्याणमध्ये देखील सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असून त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेनाआमदार विश्वनाथ भोईर यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
”स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानमध्ये काळा पाण्याची शिक्षा भोगली. कोलू चालवला, माझी मागणी आहे राहुल गांधी यांना एक दिवस कोलूला जुपा, मी शिवसेना सोडून देईल आणि राहुल गांधीच्या मागे येईल.” असे आव्हान आमदार विश्वनाथ भोईर यांनी काँग्रेसला दिले आहे.
राहुल गांधी यांचं आडनाव खान असल्याचा दावा देखील कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केला. कल्याणमध्ये ६ एप्रिल रोजी सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार विश्वनाथ भोईर बोलत होते.
काँग्रेसवाले देखील यांना वैतागलेले आहे. पण ते राजकुमार आहेत. त्यामुळे त्यांचा नाईलाज असल्याचं देखील विश्वनाथ भोईर यांनी म्हटलं आहे.