Thane Crime : भेटायला आला पण सासूने घरातच घेतलं नाही, संतापलेल्या जावयाचं कृत्य ऐकून हादराल
रागाच्या भरात त्याने पत्नीवर जोरात हल्ला केला. सासू आणि मुलगी तिला वाचवण्यासाठी पुढे आले असता त्याने त्यांच्यावरही प्रहार केला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या. या घटनेप्रकरणी शेजारापाजारी विचारपूस करून अधिक तपास करण्यात येत आहे.
ठाणे | 29 सप्टेंबर 2023 : रागाच्या भरात माणूस काहीही करून बसतो. ज्यांना आपण आपल, जवळचं मानतो त्यांच्यावर तर सर्वात जास्त राग निघतो. पण असा राग काय कामाचा जो आपल्याकडून सर्वस्व हिरावून घेईल आणि हाती पश्चातापाशिवाय काहीच उरणार नाही ! मुंब्रा येथील एक इसमालाही त्याचा राग प्रचंड महागात पडला. सासूचा राग त्याने पत्नीवर काढला आणि नको ते करून (crime news) बसला. एका कृत्याने घराची राखरांगोळी झाली आणि दु:खाचं वातावरण पसरलं.
विजय उर्फ समीर कमलनाथ मिश्रा असे आरोपीचे नाव असून त्याने रागाच्या भरात स्वत:ची पत्नी, पोटची मुलगी आणि सासू यांच्यावर हातोड्याने (attack) वार केला. या हल्ल्यात तिघीही जखमी झाल्या, मात्र त्याच्या पत्नीला जीव गमावावा लागला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कौटुंबिक वाद पेटला आणि …
आरोपी विजय उर्फ समीर कमलनाथ मिश्रा आणि जरीन अन्सारी या दोघांचे १४ वर्षांपूर्वी लग्न झाले. मात्र विवाहानंतर आरोपीने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. आरोपी हा भिवंडीतील काल्हेर येथील रहिवासी आहे. विजय आणि जरीना यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं आहेत. पण लग्नानंतर काही काळाने त्यांच्यामध्ये खटके उडू लागले. रोजच्या वादाला कंटाळून आरोपीची पत्नी जरीन ही मुलांसह मुंब्रा येथे तिच्या आईसोबत राहू लागली. तर आरोपी भिवंडीतच रहात होता. तो एका बांधकामाच्या साईटवर काम करत होता.
घटनेच्या दिवशी आरोपी विजय पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी मुंब्रा येथे पत्नीच्या माहेरी गेला. पण त्याच्या सासूने, जरीनच्या आईने आरोपीला घरात घेण्यास नकार दिला. याच मुद्यावरून त्यांच्यात भांडण झाले आणि हळूहळू त्याने वादाचे स्वरूप धारण केले. त्यांची बाचाबाची वाढली. त्यामुळे आरोपीचा राग अनावर झाला आणि त्याने मागचा-पुढचा काहीच विचार न करता पिशवीतून हातोडा काढला आणि त्याची पत्नी, सरीन हिच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात ती जबर जखमी झाली आणि मदतीसाठी हाका मारू लागली.
मुलीलाही सोडले नाही
जरीनाचाा आरडाओरडा एकून तिची आई आणि तिची मुलगी दोघीही मदतीसाठी पुढे सरसावल्या. त्यांनी आरोपीला रोखण्याचाही प्रयत्न केला. पण तो एवढा रागात होता की त्याला काहीच कळत नव्हतं. आरोपीने त्याच्या वृद्ध सासूवर आणि स्वत:च्या पोटच्या लेकीवरही हातोड्याने वार करून त्यांना जखमी केले. घरातील आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्यांनी मदतीसाठी धाव घेतली. आसपासच्या लोकांनी आरोपी विजयला पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याने सर्वांना बॉम्ब सदृश्य वस्तु दाखवून बॉम्बस्फोट करीन अशी धमकी दिली. त्यामुळे एकच घबराट निर्माण झाली.
दरम्यान हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जरीनाला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुर्दैवाने तेथे तिचा मृ्त्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी विजयला अटक केली. त्याच्या विरोधात जीवघेणा हल्ला आणि हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करून जरीन हिचा मृतदेह हा शवविछेदांनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. तर जखमी मृतकाची आई, मुलगी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मुंब्रा पोलिस अधिक तपास करीत आहेत.