ठाण्यात उद्यापासून शाळा सुरू होणार; जिल्हाधिकारी म्हणतात, मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करा

| Updated on: Oct 03, 2021 | 6:47 PM

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते इयत्ता 12 वी व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 वीच्या शाळांचे वर्ग सोमवार 4 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार आहेत. (Thane Students return to schools from October 4)

ठाण्यात उद्यापासून शाळा सुरू होणार; जिल्हाधिकारी म्हणतात, मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करा
schools
Follow us on

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते इयत्ता 12 वी व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 वीच्या शाळांचे वर्ग सोमवार 4 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांची काटेकोर व तंतोतंत अंमलबजावणी संपूर्ण ठाणे जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये करण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी अधिसूचना जारी केली आहे.

या अधिसूचनेत जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी म्हटले आहे की, 24 सप्टेंबर 2021 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास शासनस्तरावरून मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी महत्वपूर्ण अतिरिक्त मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

सूचना काय?

प्रत्येक शाळेमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करणे, शाळेत येतांना घ्यावयाची काळजी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नविन मार्गदर्शक सूचना, खेळाच्या मैदानाबाबत मार्गदर्शन, आजारी विद्यार्थी शोधणे, विद्यार्थ्यांवरील मनोसामाजिक परिणामांबाबत शिक्षकांना अवगत करणे, विद्यार्थ्यांच्या मनोसामाजिक स्वास्थ्याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन, शिक्षक-पालक बैठकीत चर्चा, घरात प्रवेश करतांना घ्यावयाची काळजी व सीएसआर निधीचा उपयोग करणे आदी महत्वपूर्ण मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

कारवाईचा इशारा

त्यानुसार या आदेशांची संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. त्यास कोणी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांच्या विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 51 ते 60, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1897 व भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 188 नुसार दंडनीय/ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या अधिसूचनेद्वारे देण्यात आला आहे.

मुंबईतील फॉर्म्युला काय?

मुंबईतील शाळा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शाळांचं सॅनिटाईजेशन करण्यात येणार आहे. तसेच आतापर्यंत 76 टक्के शिक्षकांचं लसीकरण झालं असून सर्वच शिक्षकांचं लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल त्या ठिकाणी एसओपीचं पालन करून शाळा सुरू करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी त्याबाबतची माहिती दिली आहे, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

बच्चू कडू काय म्हणाले?

एक महिन्यापासूनच शाळा सुरु व्हायला पाहिजे होत्या. पण काही अडचणी आल्या. पण येत्या 4 तारखेपासून शाळा सुरु होणार आहेत. त्या त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून शाळा सुरु केल्या जाणार आहेत. आणि मला वाटतं बऱ्याच जिल्ह्यात वातावरण चांगलं आहे. कोरोना संपल्यात जमा आहे. पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर शाळा सुरु किंवा बंद करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार राहतील.

आताच निर्णय झाला आहे. त्यामुळे कोणत्या वर्गापासून शाळा सुरु होणार हे निश्चित सांगता येणार नाही. सोशल मीडियावर अनेक पालक तसेच विद्यार्थ्यांनी शाळा सुरु कराव्यात अशी मागणी केली होती. काही संघटनांनीदेखील मागणी केली होती. सर्व गोष्टींचा निर्णय घेऊनच आपण शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशनाच्या काळात जशी आपण काळजी घेतली होती, त्याच धर्तीवर शाळा सुरु करण्यासंदर्भात काळजी घेतली जाईल. कुठे रुग्णसंख्या वाढलीच तर आपण लगेच तपासणी करुन घेऊ, असं बच्चू कडू म्हणाले होते.

 

संबंधित बातम्या:

चतु:श्रृंगी मंदिरात गुरुवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; मंदिर प्रशासन सज्ज, ऑनलाईन दर्शनाची सुविधा

माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनच; नाथाभाऊंचा गंभीर आरोप

पंकजा मुंडे आजारी, विरोधी पक्षनेत्यांचा बीड जिल्ह्यातील पाहणी दौरा रद्द!

(Thane Students return to schools from October 4)