उद्धव ठाकरे यांनी कुणालाच सोडलं नाही, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही विचारला सवाल, वाचा भाषणातील 10 मुद्दे
उद्धव ठाकरे यांनी आज ठाण्यात उत्तर भारतीय मेळाव्यात मणिपूरच्या घटनेवरुन देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाच थेट प्रश्न विचारले. मणिपूरमध्ये दोन महिलांवर अत्याचार झाले देशाच्या राष्ट्रपती महिला असूनही काय करत आहेत? असा सवाल त्यांनी केला. याच मुद्द्यावरुन त्यांनी केंद्र सरकारला ध्रुतराष्ट्र राजाची उपमा दिली.
ठाणे | 29 जुलै 2023 : उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शिवसेना ठाकरे गटाकडून आज उत्तर भारतीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा पुन्हा गद्दार असा उल्लेख केला. तसेच त्यांनी हिंदुत्व म्हणजे नेमकं काय? याबाबत भूमिका मांडली. तसेच त्यांनी मणिपूरच्या घटनेवरुन मोदी सरकारवर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
1) भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा
“माझी हिंदी आपल्याला समजेल का? की मराठी जास्त समजेल? दोन्ही समजेल ना? यालाच हिंदुत्व म्हणतात. जो एक-दुसऱ्यात भेद करतात त्याला हिंदुत्व म्हणता येणार नाही. जो एक-दुसऱ्यात भेद करतात त्यांना हिंदुत्व म्हणता येणार नाही. याला तर चाणक्य नीती देखील म्हणता येणार नाही. पण कुटनीती असते जी काही लोक आपल्या स्वार्थासाठी करतात आणि काही लोक ते करत आहेत”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
2) ‘गडकरी रंगायतन बाळासाहेबांची देण, पण काही लोक वेगळंच नाटक करत आहेत’
“भरपूर दिवसांनी ठाण्यात आलोय. असं नाही की मी पहिल्यांदा गडकरी रंगायतनमध्ये आलो आहे. तसं नाही. संजय राऊत म्हणाले की, हे गडकरी रंगायतनदेखील बाळासाहेब ठाकरे यांची देण आहे. मला लक्षात आहे की 1967 मध्ये महापालिकाच्या सभा होणार होत्या. सभा सुरु होती”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
“बाळासाहेब ठाकरे भाषण करत होते. यावेळी एक चिठ्ठी आली. त्यामध्ये लिहिलं होतं की, ठाण्यात नाट्यगृह नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की, आपण सगळ्यांनी मला सत्ता द्या. मी तुम्हाला नाट्यगृह देतो. तेव्हा पहिलं नाट्यगृह ठाण्यात आलं. नाट्यगृह तर आम्ही देवून टाकलं पण काही लोक वेगळंच नाटक करत आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
3) ‘जोश बघून काहींचे होश उडाले’
“आज हा जोश बघून काही लोकांचे होश नक्की उडाले असतील. उडायलाही पाहिजे. ज्यांना असं वाटतं की मी म्हणजे शिवसेना तर नाही. ठाणे आणि शिवसेना, तीही खरी (असली) शिवसेना. असली हा शब्द मी यासाठी वापरला कारण मार्केटमध्ये आता चायनीज मालही येतो. फक्त मालच नाही देवाच्या मूर्ती देखील येतात. पण त्यांनाही आपण देव समजून पूजा करतो. असे काही चायनीज लोक, बनावट, बोगस गद्दार, स्वत:ला शिवसेना पेक्षाही वर समजतात. पण आणखी वर जाणार तर वापस येणार नाही”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
4) ‘मी आव्हानाला संधी म्हणून पाहतो’
“राजन विचारे आणि राजनचे सर्व साथी आणि तुम्ही हे कट्टर शिवसैनिक आहेत. आपली परीक्षा आहे. आव्हानं येत राहतात. पण मी त्यांना आव्हानं नाही, तर संधी म्हणून पाहतो. परीक्षा तेव्हाच होते जेव्हा कठीण वेळ येतो. जे लढण्याच्या वेळी सोबत असतात तेच खरे सैनिक असतात. जसे तुम्ही आज माझ्यासोबत आहात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
5) ‘ज्या सरकारचा जन्मच खोक्यापासून झालोय…’
“तुम्ही जे बोललात ना की, 50 खोके एकदम ओके, ज्या सरकारचा जन्मच खोक्यापासून झालोय तर ते आपल्याला काय न्याय देणार? चित्रपट आपण पाहिला त्यामध्ये एक प्रश्न विचारला होता, शिवसेना आणि उद्धव ठाकरेने उत्तर भारतीयांसाठी काय केलं? तुम्हीच सांगा. काही केलं नसतं तर तुम्ही या ठिकाणी आला असता का? प्रश्न विचारणाऱ्यांना त्याचं उत्तर तुम्ही उत्तर भारतीयच देणार आहात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
6) ‘महाराष्ट्राची जनता मला परिवाराची सदस्य मानते’
मी सुद्धा मु्ख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हा मी कुणासोबतही भेदभाव करणार नाही, अशी शपथ घेतली होती. आपसात वाद का करायचा? कोरोना काळात जे करायचं होतं ते मी नक्कीच केलं. महाराष्ट्राची जनता मला आपल्या परिवाराचं सदस्य मानते हे माझ्य सौभाग्य आहे, असं ठाकरे म्हणाले.
7) ‘मी काँग्रेसमध्ये गेलो पण अर्ध्या रात्री चोरुन मीटिंग नाही केली’
“हिंदुत्वाचं अर्थ काय आहे? मी काँग्रेसमध्ये गेलो. हो गेलो. पण अर्ध्या रात्री चोरुन मीटिंग नाही केली. मी एक प्रश्न त्यांना विचारु इच्छितो की, आम्हाला काँग्रेससोबत जाण्यासाठी मजबूर कुणी केलं. आम्ही भाजपसोबत तर होतोच, देशाच्या इतिहासात एकमेव युती असेल की हिंदुत्ववादीसाठी अशी घट्ट मैत्री होती. ही मैत्री कोणी तोडली? आधी भाजपने तोडलं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
8) ‘भाजपला वाटत होतं जसं गळ्यात बेल्ट बांधून…’
“भाजपला वाटत होतं जसं गळ्यात बेल्ट बांधून, हो म्हणजे माझ्या गळ्यात पट्टा होता पण ऑपरेशन झालं म्हणून तशी कॉलर घालावी लागते. पण तसा पट्टे बांधणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही. कारण बाळासाहेब ठाकरे यांचं रक्त माझ्या नसात आहे. मी कधी लाचार किंवा गुलाम होणार नाही. मी जरुर झुकणार, पण आपल्यासमोर, हिंदू लोकांसमोर झुकेन. मी तानाशाही सहन करणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
9) ‘आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हातात काम असं’
“हिंदुत्व आहे काय? फक्त मंदिरमध्ये जाणारा घंटा बडवणारा हिंदू नकोय. आम्हाला अतिरेक्यांना मारणारा हिंदू हवा आहे. आमची वज्रमूठ सभेला सर्व जातीचे लोक आले होते. या लोकांनी नकली हिंदूंनी सभास्थळी जावून गोमूत्र शिंपडलं. अरे माणसासारखी माणसं सभेला आली होती आणि त्यांना तुम्ही अपित्र मानता? आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हातात काम असं आमचं हिंदुत्व आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
10) उद्धव ठाकरे यांचा मणिपूरच्या घटनेवरुन सरकार, राष्ट्रपती आणि राज्याच्या राज्यपाल यांच्यावर एकत्र निशाणा
“माणसा-माणसामध्ये भेद करणाऱ्याचा मुखवटा फाडून काढायचा आहे. मणिपूर जळत आहे. हेच आपलं हिंदू राष्ट्र आहे? मी मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा बोलायचं सुरु होतं. ज्या हनुमानने सीतेसाठी लंका जाळली, सीता हरण झालं म्हणून रामायण घडलं, द्रौपदीचं वस्त्रहरण झालं म्हणून महाभारत घडलं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“दु:खाची गोष्ट तर हीच आहे की, द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तेव्हा तिथे ध्रुतराष्ट्र राजा बसले होते. त्यांना दृष्टी नव्हती. आजचं सरकार जे बसलं आहे ते ध्रुतराष्ट्र आहे. आपल्याही देशात दोन महिलांसोबत जे केलं ते व्हिडीओमुळे समोर आलं. तिथले मुख्यमंत्री म्हणत आहेत की, अशा घटना भरपूर घडल्या आहेत. अरे लाज वाटली पाहिजे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
“राष्ट्रपती महिला आहेत, काय करत आहेत? मी महामहीम राष्ट्रपतींना विचारु इच्छितो, राष्ट्रपती महोदया तुम्ही ज्या राष्ट्रपती आहेत त्या देशातील महिलांची आब्रू भर रस्त्यावर लुटली जात आहे. आपल्याला काही संवेदना नाहीत का? तिथल्या राज्यपाल महिला आहेत. त्या काहीच करत नाहीत. आमच्या इथे जे राज्यपाल होते ते कशी मस्ती करत होते. त्यांना पाठवा तिथे. मंदिर उघडा ते उघडा. कोरोना संकट एवढं सोपं होतं का? असे राज्यपाल तिकडे का पाठत नाहीत?”, असे सवाल ठाकरेंनी केले.
“मी विरोधी पक्षांची एकजूट मानत नाही तर ज्या सर्व पक्षांची एकजूट झालीय तिचं नाव इंडिया आहे. पण इंडियावरही त्यांनी टीका केली. त्यांनी इंडिया मुजाहीद्दीन म्हणत टीका केली. पंतप्रधान एक-दोन दिवसात महाराष्ट्रात येणार आहेत. गद्दारांसोबत बसणार आहेत. त्यांचा सत्कार करणार आहेत. हेच आपलं हिंदुत्व आहे?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.