धाकधूक वाढली, बारवी डॅम भरत आलं, नदीत पाण्याचा विसर्ग सुरु होण्याची शक्यता
बारवी डॅम आता भरत आल्याने नदीकाठच्या नागरिकांची धाकधूक वाढली आहे. धरण परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. असं असताना धरणाच्या पाण्यातून नदीत विसर्ग सुरु झाल्यानंतर पाणी नदीकाठच्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बदलापूर (ठाणे) | 27 जुलै 2023 : ठाणे जिल्ह्यात प्रचंड मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषत: जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या शहरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. या शहरांमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून प्रचंड मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या शहरांमधील अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरलं आहे. विशेष म्हणजे या शहरांसाठी महत्त्वाचं असणारं बारवी धरण आता जवळपास ओव्हरफ्लो होण्याच्या तयारीत आहे. बारवी धरणाची पातळी आता कधीही 72.60 मीटरवर पोहोचू शकते. पाणी पातळी 72.60 मी.वर पोहोतल्यानंतर धरणाते स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडणार आहेत. त्यामुळे बारवी धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची धाकधूक वाढली आहे. धरणातलं पाणी सोडलं जातं तेव्हा पूर येतो अशी भीती नागरिकांमध्ये असते. त्यामुळे प्रशासनदेखील सतर्क झालं आहे. विशेष म्हणजे पाऊस हा थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीय.
बारवी धरणातून कधीही पाणी सोडलं जाऊ शकतं. याबाबत बारवी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता दुशांत उईके यांनी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी तालुक्याच्या तहसीलदारांना काल संध्याकाळी पत्र पाठवलं होतं. हे पत्र काल संध्याकाळी ठाणे जिल्ह्यात व्हायरल झालं होतं. या पत्रात बारवी धरणातून बारवी नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत माहिती देण्यात आली होती. या पत्रात महत्त्वाची माहिती देण्यात आलीय.
बारवी धरणाची पाणी पातळी काल संध्याकाळी चार वाजेपर्यंत 70.50 मी. पर्यंत पोहोचली होती. ही पातळी 72.60 मी. पर्यंत पोहोतल्यास धरणाचे स्वयंचलित दरवाजे हे उघडतील आणि बारवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु होईल. पाणी पातळी 72.60 मी. च्या खाली गेल्यानंतर पुन्हा दरवाजे बंद होतील, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर सदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे बारवी धरणातून आतापर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला नाहीय. त्यामुळे पाणी पातळी वाढली आहे. धरणाची पाणी पातळी 72.60 मी. पर्यंत पोहोचल्यानंतर स्वयंचलित दरवाजांमुळे पाण्याचा विसर्ग सुरु होणार आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर बारवी नदीच्या तिरावरील विशेषत: अस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, कारंद, मोऱ्याचापाडा, चोण, रहाटोली गावांना आणि शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कल्याणमध्ये मुसळधार पाऊस
कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये आज सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान, दुपारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र दुपारनंतर पावसाने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला. मुसळधार पावसामुळे कल्याण पश्चिमेकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरात फुटभर पाणी रस्त्यांवर साचल्याचे पाहायला मिळतं आहे. त्यामुळे रस्ता मार्गक्रमण करणाऱ्या वाहनचालकांना, नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरातील इतर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय कल्याण रेल्वे स्थानप परिसरातही रेल्वे रुळात पाणी साचायला सुरुवात झालीय.