गर्दी जमतेय, मराठ्यांची उद्या ऐतिहासिक सभा, मनोज जरांगे यांचं महत्त्वाचं आवाहन
अंतरवली सराटीमध्ये 14 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता सभा होणार आहे. या सभेची व्यवस्था पूर्ण झालीय. 5 हजाराऊन जास्त स्वयंसेवक येथे सेवा देणार आहेत. कितीही गर्दी असली तरी मराठा समाज घरी थांबणार नाही. तो कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार आहे असे जरांगे पाटील म्हणाले.
जालना : 13 ऑक्टोबर 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवली सराटी येथे 14 सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत द्या असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांच्या विनंतीला मन देऊन मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले. या घटनेला 14 ऑक्टोबरला एक महिना पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील पुन्हा अंतरवली सराटीमध्ये सभा घेत आहेत. या सभेसाठी सकल मराठा समाज अंतरवली सराटीमध्ये जमा होऊ लागला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या सभेची जागेची पाहणी केली. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सभेसाठी येणाऱ्यांना महत्वाचे आवाहन तसेच काही सूचना केल्या आहेत.
आपल्या पायाखाली मुंगी सुद्धा मरु नये
कार्यक्रम बरोबर 12 वाजताच होणार. गर्दीत मला नको काही गडबड होईल म्हणून घरात थांबू नका. घरी राहून न्याय मिळणार नाही. येताना डोक्यावर रुमाल, टोपी घालून यावं. सोबत पाण्याची बॉटल घेऊन यावी. जेवणाचा डब्बा देखील घेऊन यावं. काही गैरसोय झाली तर नाराज होऊ नका. आजूबाजूच्या गावांनी पाण्याची, जेवणाची सोय करावी. ही सभा शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य करावे. पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. पोलिसांना कोणताही त्रास होणार नाही. मराठा समाजाला डाग लागू नये. आपल्या पायाखाली मुंगी सुद्धा मरु नये, याची काळजी घ्या असे आवाहन त्यांनी केले.
हा कार्यक्रम देखील ऐतिहासिक होईल
आपण आपल्या गाड्यांचे डिझेल आजच भरून ठेवा. पंपावरील गर्दी टाळा. सर्वांनी वाहन दमाने चालवावीत. महाराष्ट्रातून येणाऱ्या गाडीला झेंडा, स्टिकर लावा. आपली गाडी कुठेच अडवली जाणार नाही. मराठा बांधवांनी पोलिसांना सहकार्य करावे. सर्वांनी शांततेत यायचं, शांततेत जायचं. मराठ्यांनी इतिहास रचलाय हा कार्यक्रम देखील ऐतिहासिक होईल, असे ते म्हणाले.
छगन भुजबळ यांना टोला…
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की सभेसाठी सात कोटी आणले कुठून? या सभेसाठी 123 गावांनी राज्यातील इतर गावातील समाजाची सेवा करण्याचं ठरवलं. आमचे पैसे घाम गाळून आणि पिकाच्या उत्पन्नातून आले आहेत. कोणी 500 रुपये दिले, कुणी हजार रुपये दिले. 123 गाव सोडून कुणाकडे पैसे मागितले असतील तर दाखवून द्या. 123 गावातील फक्त 31 गावांच्याच लोकांच्या खर्चात का कार्यक्रम होत आहे. उर्वरित गावांच्या पैशांची गरज पडली नाही. आमची कसलीही चौकशी करा, असे आव्हान त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिकवत आहेत का?
सरकारकडून काही डाव टाकला जाण्याची शक्यता आहे. पण, हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. सरकार एक, दोन, चार जणांना सोबत घेईल. सर्व समाजाला सोबत घेणार नाही. तुम्ही मला डिवचू नका नाही तर मी मागे लागेल. गप्प पडा असा इशारा त्यांनी भुजबळ यांना दिला. तुमचं दोन एकर वावर होत. तुम्ही एकर खाता, मंडल कमिशनने 14 टक्के आरक्षण दिलंय, त्यांचं नाव प्रतिष्ठा उंचावण्यासाठी मराठा समाजाने कष्ट केले. त्यांच्यावर मराठा समाज नाराज होतोय. यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिकवत आहेत का? बोलायला लावत आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मी चोंडीला जाणार
देवेंद्र फडणवीस हे घटनात्मक पदावर माणूस बसले आहेत. त्यांच्याकडून मराठा द्वेष दिसतोय. मराठा समाजाने त्यानांही मोठं केलं याची जाणीव त्यांनी ठेवावी. त्यांची भाषाच वेगळी आहे. ते येवल्याचे साहेब पण तसेच, असा टोलाही त्यांनी लगावला. मराठा आणि धनगर एक आल्यावर सरकारचं कसं होईल? आम्ही दोघांनी मनावर घेतले तर तुम्ही काय करणार? धनगर समाजाने जाहीर पाठिंबा मला दिला त्यामुळे मी चोंडीला जाणार असे त्यांनी सांगितले.