Diwali Bonus : दिवाळीपूर्वी ST कर्मचाऱ्यांचे पगार होणार; राज्य सरकारने काढले लेखी आदेश
एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पगार आणि बोनस दिवाळी पूर्वी देण्यासंबधीचे लेखी आदेश सरकारने जारी केले आहेत.
मुंबई : एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी एक गोड बातमी आहे. दिवाळीपूर्वी ST कर्मचाऱ्यांचे पगार होणार असून त्यांना बोगनस देखील मिळणार आहे. यासाठी आवश्य असलेल्या निधीची तरतूद राज्य सरकारने केली आहे. एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पगार आणि बोनस दिवाळी पूर्वी देण्यासंबधीचे लेखी आदेश सरकारने जारी केले आहेत.
मागील अनेक काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. एसटी कर्मचाऱ्याचे पगारही रखडले होते. मात्र, आता हळू हळू एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची स्थिती सुधारत आहेत.
सत्तांतरानंतर राज्यात अस्तित्वात आलेले शिंदे-फडणवीस सरकार एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांबाबत सकारात्मक आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचे पगार व्हावेत अशी मागणी करण्यात आली होती.
याची दखल घेत दिवाळीसाठी राज्य सरकारने 45 कोटी रुपये परिवहन महामंडळाला वर्ग केले आहेत. पगार वेळेत मिळावेत यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठपुरावा केला होता.
राज्य सरकारने दिवाळी भेट म्हणून 45 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यानुसार दिवाळी आधी एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पगार अदा करण्यात यावेत असे लेखी आदेश राज्य सरकारने काढले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिवाळी बोनस देखील जाहीर केला आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सरसकट 5,000 रुपये बोनस दिला जाणार आहे.
वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि दिवाळी पूर्वी पगार देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी पूर्ण प्रकाशमान करतील असा विश्वास सदावर्ते यावेळी व्यक्त केला होता.