पुण्यात तुफान पाऊस; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले पुण्यातील पूरस्थितीच्या चौकशीचे आदेश
मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत
पुणे : राज्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. पुण्यात सोमवारी नऊ वाजल्यापासून तुफान पाऊस सुरु झाला. जंगली महाराज रस्ता, अलका टॉकीज चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड जवळ गुडघाभर पाणी जमा झाले. यामुळे पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले.
पुण्यात सोमवारी दिवसभर ऊन सावलीचा खेळ सुरु होता. रात्री अचानक धो धो पाऊस सुरु झाला. यामुळे पुणेकरांची चांगलीच त्रेधा-तिरपीट उडाली.
येवलेवाडी स्मशानभूमीजवळ तसेच सुखसागर नगर, अंबामाता मंदिर, कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड, झाडपडी, हडपसर, आकाशवाणी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सोमवार पेठ परिसरतही पाणी शिरले.
दरम्यान, पुण्यात वारंवार निर्माण होणाऱ्या पूरजन्यस्थितीची चौकशी होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या पूरस्थितीसंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. पुणे शहरातील 400 किमी रस्ते दुरुस्त केले जाणार असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.