कोरोना सेवेसाठी जागा वापरली म्हणून त्र्यंबकेश्वर देवस्थानने प्रशासनाकडे चक्क एक कोटी रुपये मागितले
कोरोनाकाळातील (Corona) सेवेसाठी प्रशासनाने वापरलेल्या जागेच्या भाड्यापोटी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) देवस्थानने प्रशासनाकडे चक्क एक कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
नाशिकः देवस्थाने म्हणजे जनतेचा आधारवड. त्यांनी पिचलेल्या, रंजलेल्या, गांजलेल्यांचा आधार व्हावा. नाशिकमध्ये (Nashik) मात्र उलटेच घडताना दिसत आहे. कोरोनाकाळातील (Corona) सेवेसाठी प्रशासनाने वापरलेल्या जागेच्या भाड्यापोटी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) देवस्थानने प्रशासनाकडे चक्क एक कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Trimbakeshwar Devasthan asks administration for Rs 1 crore for rent of space used for coronal service)
कोरोनाच्या संकटाने साऱ्या जगाला कोंडीत पकडले. असे संकट यापूर्वी कधी आले नसेल. त्यामुळे अख्खे जग लॉकडाऊन झाले. महाराष्ट्रानेही कित्येक महिने टाळेबंदी अनुभवली. लाखो लोकांना प्राण गमवावे लागले. या काळात अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. कित्येक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. अनेक देवस्थानांनी आपल्या तिजोऱ्या रित्या केल्या. नाशिकमध्ये मात्र थोडे वेगळेच पाहायला मिळत आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानची जागा प्रशासनाने कोरोनाकाळातील सेवेसाठी अधिग्रहित केली होती. या जागेच्या भाड्यापोटी आता देवस्थानने प्रशासनाकडे तब्बल 99 लाख 63 हजार रुपये इतक्या रकमेची मागणी केल्याने नवा वाद निर्माण झालाय. या इतक्या मोठ्या रकमेच्या मागणीनंतर जिल्हा प्रशासनाने देवस्थानला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारे खरमरीत पत्र लिहून कान टोचले आहेत.
पत्रात काय…? जिल्हा प्रशासनाने त्र्यंबक देवस्थानला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या संस्थानाची नोंद सार्वजनिक न्यास स्वरूपाच्या सेवाभावी संस्थानात आहे. त्यामुळे अशा संस्थानाने शासनाच्या मोफत उपचाराच्या प्रयत्नास सहकार्य करणे आवश्यक होते. तथापि, असे न करता आपण अनाकलनीय व कोणताही खुलासा नसलेली पैशांची मागणी केली आहे. आपली ही मागणी योग्य नाही, अशा शब्दांत त्र्यंबक देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांना उपदेशाचे बोधामृत पाजले आहे. शिवाय प्रशासनाने संस्थानला विस्तृत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी एकीकडे राज्यातील अनेक दानशूर संस्था, मंदिरे कोरोना काळात सरकारच्या मदतीसाठे पुढे आली. इतकेच नाही तर गावखेड्यातील आणि शहरातील अगदी छोट्या-छोट्या मंडळांनी मदतीसाठी खारीचा वाटा उचलला. अशा भयान संकटात दिलेल्या जागेच भाडे मागणे अतिशय अयोग्य प्रकार आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या तिजोरीत कोट्यवधी रुपये पडलेले असताना असा क्षुद्रपणा दाखविणे योग्य नाही. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी देवस्थानच्या माजी विश्वस्तांनी केली आहे. (Trimbakeshwar Devasthan asks administration for Rs 1 crore for rent of space used for coronal service)
इतर बातम्याः
भाजप विरुद्ध भाजप; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये रंगला सामना
अन् मरणाच्या दारातून परतलो; जळगावच्या ओबीसी परिषदेत भुजबळांनी सांगितली दुखरी आठवण!