‘प्रकाश आंबेडकर यांना आजमावून बघा, अख्खा बाजार उठवू’, कुणी दिलं कुणाला आव्हान?
तीन चार महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस अकोल्याला आले तेव्हा ते म्हणाले ही रेकॉर्ड ब्रेक सभा आहे. त्यांनी आता ही अकोलामधील सभा पहावी. प्रस्थापित लोकांच्या डोळ्यांत डोळे टाकून आम्ही काम करत आहे. आमची गर्दी पैसे देऊन झालेली नाही, असा टोला त्यांनी लगावला.
अकोला | 25 ऑक्टोंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. त्यांना बळ दिले पाहिजे. ते जे काही करत आहे ते प्रामाणिकपणे करत आहेत. राज्यात शाळा अंगणवाडी यांचे कंत्राटीकरण सुरू आहे. आपल्या इथल्या मुलांना नोकरी नाही. नोकऱ्या बंद केल्या. आरक्षण बंद करण्यासाठी कंत्राटी नोकर भरती सुरु आहे. कंत्राट हे खासदार, आमदार यांच्या पोरांना दिले जातेय. अजित पवार यांच्या सालगड्याला कंत्राट दिले जातात. ठेक्यावर देवून ठेवला महाराष्ट्र माझा असे म्हणायची वेळ आली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केली.
अकोला येथे धम्म मेळाव्यानिमित्त काढण्यात रॅलीत सुजात आंबेडकर सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. लोक्स्बेची तयारी जवळपास सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. वंचित बहुजन आघाडीचीही तयारी सुरु झालीय. अकोला येथील उमेदवार प्रकाश आंबेडकर असतील असे त्यांची जाहीर केले आहे. त्यांचे एक व्हिजन आहे. राजकारणाचा सेन्स आहे. दोन पक्ष फुटण्यापूर्वी त्यांनी राजकीय बॉम्ब फुटणार असे सांगितले होते आणि पुढे काय झाले ते आपण पाहिले असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी काल सभेत बोलताना एका पक्षाचे सरकार नको अशी भूमिका मांडली ती योग्य आहे. राज्यात नेहमी युतीचे सरकार आले आहे. आज भाजपने पक्ष फोडून सरकार बनवले आहे. ज्या राष्ट्रवादीला मतदान केले. त्याला भाजपने सत्तेत बसवले त्यामुळे बरेच मतदार नाराज झाले आहेत. आमदार जर भाजपात जाऊन बसणार असतील तर त्यांना मतदान कोण करणार? त्यामुळे हे सरकार डगमगणारे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली.
भाजप आणि आरएसएस सत्तेत असल्यामुळे मोठे अन्याय होत आहेत. तीन महिन्यापासून तिकडे मणिपूर जळत आहे हे मोदी, शहा यांचे षडयंत्र आहे. भाजपचा पराभव इकडची आंबेडकरी जनताच करू शकते. यांनी काही नकली आंबेडकरवादी पगारावर ठेवले आहे. आपल्या शहरात काही नकली आंबेडकरवादी आले आहेत, अशी टीका त्यांनी रामदास आठवले यांचे नाव न घेता केली.
मागील वेळी लोकांनी अपप्रचार केला की ही भाजपची बी टीम आहे. तुमच्याकडे काही पुरावा आहे का? ज्यांनी बी टीम म्हटले तेच नेते आता ईडीच्या भीतीने मालमत्ता टिकवायला कुठे गेले हे आपण पहाता आहात. ते आपला अर्धा पक्ष घेऊन भाजपमध्ये गेले. दिल्लीत एक जण म्हणतात ‘नफरत के बाजार मे मोहबत का दुकानं’. मी त्यांना इतकचं सांगेन एवढया मोठ्या द्वेशाच्या बाजारात छोट दुकान कसं चालेल? प्रकाश आंबेडकर यांना एकदा आजमावून बघा. भाजपचा अख्खा बाजार उठवून टाकू असा इशारा त्यांनी दिला.