Maharashtra Breaking News LIVE 15 April 2025 : धनंजय मुंडे यांची संपूर्ण कुंडली कराडकडे आहे- करुणा शर्मा
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 15 एप्रिल 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES
-
बीपीएससी मुख्य परीक्षेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, लवकर सुनावणी नाकारली
बीपीएससी मुख्य परीक्षा 2025 चा विषय सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. मुख्य परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सध्या या याचिकेवर लवकरच सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
-
मुंबईत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ पार्क केलेल्या गाड्यांना लागली आग
मुंबईतील अंधेरी परिसरातील क्रिस्टल टॉवरसमोरील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार ते पाच वाहनांना भीषण आग लागली. ही घटना दुपारी २.३० च्या सुमारास घडली, जेव्हा अचानक वाहनांमधून धूर आणि ज्वाळा निघू लागल्या. आग वेगाने पसरत असल्याने घटनास्थळी गोंधळ उडाला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. दरम्यान, घटनास्थळाभोवती उभ्या असलेल्या इतर वाहनांना पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
-
-
दिल्ली सरकारची मंत्रिमंडळाची बैठक आज, ईव्ही धोरणावर चर्चा होणार
आज दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ईव्ही धोरणावर चर्चा होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भागधारकांच्या मतासाठी समितीकडे पाठवले जाईल.
-
धनंजय मुंडे यांची संपूर्ण कुंडली कराडकडे आहे – करुणा शर्मा
धनंजय मुंडे यांची संपूर्ण कुंडली कराडकडे आहे. त्यांची कुंडली उघडपणे लोकांसमोर येऊ नये यासाठी बहुतेक धनंजय मुंडे रणजित कासले याचे एन्काऊंटर करायला सांगू शकतात असेही करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.
-
सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याचा हल्ला
सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याचा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. संभाजी भिडे गुरुजींच्यावर कुत्र्याने हल्ला करत डाव्या पायाचा चावा घेतला आहे. शहरातील माळी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. शासकीय रुग्णालयात संभाजी भिडे गुरुजींवर उपचार करण्यात आले आहेत. रात्री अकराच्या सुमारास एकाच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून घरी जात असताना कुत्र्याने चावा घेतला.
-
-
लाडकी बहिण योजनेचा जीआर निवडणुकीपूर्वीचा – आशिष जयस्वाल
“लाडकी बहिण योजनेत जाचक अटी न ठेवता महिलांना लाभ दिला. योजनेचा जीआर निवडणुकीपूर्वीचा, त्यात कोणताही बदल नाही. अटी सरकारने बदलल्या नाहीत. सरकार 2100 रुपयापर्यंतच आश्वासनही पूर्ण करेल” राज्य मंत्री आशिष जयस्वाल यांनी ही माहिती दिली.
-
गडचिरोली देऊळगाव धान खरेदीत तफावत
गडचिरोली देऊळगाव धान खरेदी केंद्रात पुन्हा एक प्रकरण आलं समोर. 2 कोटी 50 लाख रुपयाच्या धान खरेदीत तफावत आढळून आली. 2024-25 मध्ये खरेदी केलेल्या धान प्रकरणात 2 कोटी 50 लाख रुपयाचे बारदान व भरडाईत मोठी तफावत आढळून आल्याने चौकशीला वेग आलेला आहे.
-
-
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप नेत्यांमध्ये दोन गट. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वखाली झालेल्या भाजप-काँग्रेस नेत्यांच्या पॅनल विरोधात सुभाष देशमुख स्वतंत्र पॅनल लढवण्यावर ठाम. भाजपने काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्याने माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख स्वपक्षीय नेत्यांवर संतापले.
-
Maharashtra Breaking: पुणे येथे पाणी बचतीसाठी महापालिका शहरातील सोसायटींना पाठवणार पत्र
जलसंपदा विभागाने पाणी वाचवण्याच्या केलेला अहवाल या पार्श्वभूमीवर पालिका जनजागृती करणार आहे… वाढत्या उन्हामुळे रोजच्या दैनंदिन पाण्याची मागणी दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढत आहे… त्यामुळे धरणातून पाणी उचलण्याचे प्रमाण वाढले आहे… तीन महिने पाणी धरणातले पुरले पाहिजे यासाठी पालिका शहरातील सोसायटीमध्ये जनजागृती करणार… यामध्ये सोसायटी टाक्यामधील गळती थांबवावी, पाण्याचा अनावश्यक वापर थांबवावा, अंतर्गत वाहिन्यातील गळती थांबवावी, पंप वेळेवर बंद करावेत. याबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे…
-
Maharashtra Breaking: एलफिन्स्ट ब्रिज पाडला जाऊ नये याकरता मनसेचे पुलाखाली आंदोलन
पालिकेच्या, ट्राफिक अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत नागरिकांच्या हरकती आणि सूचनाबाबत तुम्ही काय निर्णय घेतला आहे स्पष्ट करा… या मागण्या घेऊन मनसे आक्रमक… मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू… जो पर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही पूल पाडू नका अन्यथा रस्त्यावर ऊतरू असा इशारा…
-
Maharashtra Breaking: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप?
आता विरोधी पक्षांची स्पेस भरून काढण्याच्या निर्धाराने तीन बडे नेते येणारे एकत्र… पुण्यात तीनही नेत्यांचा होणार मेळावा… राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर यांची एकत्रित आघाडी… येत्या रविवारी होणार ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’… खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार.! या टॅगलाईन खाली “युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५” होणार… महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवी आघाडी
-
Maharashtra Breaking: अमरावतीत ठाकरे गटाचा निर्धार मेळावा…
मेळाव्याला ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत मार्गदर्शन करणार… आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा निर्धार मेळावा… यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, आमदार नितीन देशमुख मेळाव्यात मार्गदर्शन करणार…
-
कर्जमाफीसाठी अनोखे आंदोलन
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचं स्मशान भूमीत अनोखं आंदोलन सुरु केले आहे. स्मशानभूमीतल्या चितेवर झोपून आंदोलनाला सुरुवात केली आहे. कारभारी म्हसलेकर असं या ठाकरे गटाच्या पदाधिकार्याचं नाव आहे. बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण या गावात आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे.
-
राम सातपुते यांची मोहितेंवर टीका
करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना लुटारू मोहितेंच्या हातात देऊ नका हे सांगायला मी इथं आलोय, अशी टीका माजी आमदार राम सातपुते यांनी केली आहे.
-
दादा निधी देत नाहीत, शिंदेंची शाहांकडे तक्रार
अजितदादा निधी देत नाहीत, अशी तक्रार एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार केली, असे खासदार संजय राऊत म्हणाले. त्यावर शिंदेंची शाहांनी त्यांच्या पद्धतीने समजूत काढल्याचे ते म्हणाले.
-
हरणाची केली सूटका
घोडबंदर रोडवरील कासार वडवली साईनगर येथील एमबीसी पार्क येथे एका हरणाचे दर्शन झाले. ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलेल्या या हरणाला रेस्क्यू करण्यात वन विभागाला यश आले. त्या हरणाच्या एका पायाला जखम झाली असून त्याला जंगलात मुक्त करण्यात आले.
-
राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली
राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली आहे. लाडक्या बहिणींना आता 500 रुपये देण्यात येत आहेत. लवकरच ही रक्कम शुन्यावर येईल, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.
-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज गुजरात दौरा
काँग्रेसच्या गुजरात अधिवेशनानंतर दुसऱ्याच आठवड्यात पक्षाची बैठक होत आहे. त्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आज गुजरात दौर्यावर आहेत. आगामी काळात होणार्या विधानसभा निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीसाठी बैठक महत्वाची मानण्यात येत आहे.
-
बुलढाण्यात अपघात, चार जणांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यात मध्यप्रदेश परिवहन महामंडळाची बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
-
सूतगिरणी शासनाच्या परवानगीशिवाय कन्व्हेन्शन तत्त्वावर भाडेतत्त्वावर
यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील पिंपळगाव कान्हा येथील बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणी नियमबाह्यपणे शासनाच्या परवानगीशिवाय कन्व्हेन्शन तत्त्वावर भाडेतत्त्वावर दिली. अशी तक्रार पुसद येथील पंजाबराव खडकेकर आणि डॉ मोहम्मद नदीम यांनी वस्त्रोद्योग आयुक्त नागपूर यांच्याकडे केली. या पत्राची दखल घेत वस्त्रोद्योग आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली.
-
ठाणे पोलिसांनी ८१८ तक्रारी काढल्या निकाली
ठाणे पोलिसांनी सुरु केलेल्या १०० दिवसाचा कृती आराखडा या उपक्रमांतर्गत १२ एप्रिल शनिवारी आणि १३ एप्रिल रविवारी या दोन दिवसात नागरिकांचे ८१८ अर्ज निकाली काढण्यात आले. ठाणे पोलिसांद्वारे प्रलंबित असलेल्या १ हजार ७८५ अर्जदारांना बोलाविण्यात आलेले होते. त्यापैकी प्रत्यक्ष ९९० अर्जदार सदर तक्रार निवारण दिनाच्या कार्यक्रमास हजर होते.
-
धाराशिव जिल्ह्यात उष्णतेची लाट
धाराशिव जिल्ह्यात आजपासून 17 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पारा 42 ते 44 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. तसेच हवेत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
-
नाशिक – आजपासून जिल्ह्यातील शाळा दुपारी 12 वाजताच्या आधीच सुटणार
नाशिक – आजपासून जिल्ह्यातील शाळा दुपारी 12 वाजताच्या आधीच सुटणार आहे. वाढत्या उन्हामुळे वेळेत बदल करण्यात आला आहे. स्टेट बोर्डांच्या शाळांकडून नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र सीबीएसई त्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याने संभ्रम आहे.
हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला. आजपासून शाळांना सकाळच्या सत्रातच कार्य करण्याचे आदेश दिले आहेत.
-
नाशिक – द्राक्ष निर्यात एक लाख मेट्रिक टन टप्पा पार
नाशिक – द्राक्ष निर्यात एक लाख मेट्रिक टन टप्पा पार झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निर्यातीत २० टक्के घट झाली. यंदा हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाला. मार्च आर्थिक वर्षअखेरपर्यंत ८ हजार कंटेनरमधून १ लाख १० हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली.
युरोपियन देशांसह रशिया, फ्रान्स, युक्रेन, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, नेदरलँड, स्वीडन, पोलंड, स्पेनसह आदी देशांत द्राक्ष निर्यात करण्यात आले. उत्पादनात २० टक्के घट होऊनही, यंदा निर्यात झालेल्या द्राक्षांना ९० ते १२५ रुपये प्रति किलो दर भाव मिळाला आहे.
-
मुंबईतील वॉटर टँकर असोसिएशनचा संप मागे
मुंबईतील वॉटर टँकर असोसिएशनचा संप मागे घेण्यात आला असून पुन्हा पाणीपुरवठा सुरू झाला आहे. वॉटर टँकर असोसिएशनच्या संपामुळे अनेक उद्योगांना फटका बसला होता.
-
शिक्षक भरती घोटाळ्यातील महत्त्वाची ऑडिओ क्लिप टीव्ही 9 च्या हाती
शिक्षक भरती घोटाळ्यातील महत्त्वाची ऑडिओ क्लिप टीव्ही 9 च्या हाती लागली आहे. क्लिपमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणातील कागदपत्रांसंबंधित उल्लेख आहे. मुख्य आरोपी निलेश मेश्रामची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
-
सोलापुरात मध्यरात्री एका सूत गोडाऊनला भीषण आग
सोलापुरात मध्यरात्री एका सूत गोडाऊनला भीषण आग लागली. या भीषण आगीत सूत गोडाऊनमधील सूत जळून खाक झालं. निलम नगर भागातील संगशेट्टी सूत गोडाऊनला आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती आहे. दरम्यान रात्री उशिरा अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
-
ठाणे महापालिकेची नालेसफाईसाठी निविदा प्रक्रिया लगबग
ठाणे महापालिकेची नालेसफाईसाठी निविदा प्रक्रिया लगबग सुरू झाली. घनकचरा विभागाने नऊ प्रभाग समिती अंतर्गत नालेसफाईच्या कामाचे कार्याध्यक्ष काढण्याची लगबग सुरू झाली आहे. एप्रिल अखेरीस प्रत्यक्ष नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्याची तयारी केली आहे. नऊ प्रभाग समिती अंतर्गत मुख्य नाले आणि त्यास जोडणाऱ्या लहान मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी 10 कोटी 29 लाखाचे निविदा प्रसिद्ध केली आहे.
-
सोलापुरात सोमवारी उच्चांक 42.2 अंश सरासरी तापमानाची नोंद
सोलापुरात सोमवारी उच्चांक 42.2 अंश सरासरी तापमानाची नोंद झाली. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाचा विक्रम मोडला आहे. महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाची तापमानाची नोंद सोलापुरात झाली. सोलापुरात हवामान खात्याकडून तीन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सात दिवसांपूर्वी 42 अंशांवर सोलापुरातील तापमानाचा पारा गेला होता.
-
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला थकीत कराबाबत नोटीस
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला थकीत कराबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. थकीत मिळकत कराबाबत पालिकेत सुनावणी होणार आहे. सुनावणीत कर वसूल करण्याचा निर्णय होणार आहे. पालिकेत येत्या दोन दिवसात सुनावणी होणार आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिला तनिषा सुशांत भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी आज ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळणार आहे. या प्रकरणात दीनानाथ रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे. यापूर्वी आलेल्या दोन्ही अहवालात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला होता .राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार असून त्यातही तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात आलेल्या दोन अहवालांवर चर्चा होणार आहे. याप्रकरणी भाजप आमदार अमित गोरखे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत. डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे. तर दुसरीकडे तुळजापुर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तब्बल दोन महिन्यानंतर आज कोर्टात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. ड्रग्ज प्रकरणात एकूण 35 आरोपी निष्पन्न झाले असून यातील 14 आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
Published On - Apr 15,2025 7:55 AM