उद्धव ठाकरे यांची भाजपवर जळजळीत टीका, ‘तर पोटात दुखण्याचे कारण काय?
तुम्ही म्हणालात जो काही इतिहास आहे तो तुम्ही घडवलेला नाही. आपण इतिहास घडवू शकतो की नाही कल्पना नाही. पण जो इतिहास लिहिलेला आहे तो वाचवण्याची तरी ताकद आपल्यात असायला पाहिजे. ज्याचे मोठं कर्तृत्व आहे त्या कर्तुत्वाला कधीही लहान करण्याचा प्रयत्न केला नाही.
मुंबई : 15 ऑक्टोबर 2023 | महाराष्ट्राला विचाराची परंपरा आहे. कर्तुत्वाची परंपरा आहे. महात्मा फुले यांनी महिलांना शिकवण्यासाठी आधी सावित्रीबाई फुले यांना शिकवले. त्यामुळे महिला शिक्षणात पुढे आल्या. देशाला दुसऱ्यांदा महिला राष्ट्रपती मिळाल्या. प्रत्येक पातळीवर जेव्हा विरोध होतो तेव्हा तेव्हा आपल्याला विजय मिळतो. लढाई होत असते विचारांची लढाई होते. आमची लढाई विचारांची होती. व्यक्तींची नव्हती त्यामुळे आज आपण परत एकत्र येऊ शकलो. आपण आपले विचार सांगायचे ज्यांना पटले नसतील ते वेगळे होतात, होत आहेत. वेगळे असायलाच पाहिजे. पण, उद्देश एक असला तर वेगळे असणारेही एकत्र येतात. त्यामुळे आज आपण सगळे एकत्र जमलो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
समाजवादि जनता परिवारच्या वतीने 21 जनसंघटनांचे प्रतिनिधीची बैठक आयोजित करण्यात आली होती. कामगार नेते शशांक राव, असीम राव, सुभाष मालगी, शान ए हिंदही, नितीन वैद्य, आमदार कपिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत 21 जनसंघटनांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत रहाण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
ज्या पद्धतीने आपण चाललेलो आहोत ते प्रवाहाच्या विरोधात चाललो आहोत. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासाठी उडी मारली आहे. तुमच्यात काय ताकद आहे ती दाखवा. आम्हाला थांबून दाखवा. पण, प्रवाहाला ताकद नाही अशी टीका त्यांनी भाजपवर केली. संयुक्त महाराष्ट्र असेल, स्वातंत्र्य चळवळ असेल तेव्हा संघ कुठे होता? संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये संघ नव्हता. त्याचा कुठे उल्लेख नाही. संयुक्त महाराष्ट्र समिती महाराष्ट्रासाठी सगळी पक्ष एकत्र येऊन तयार झाली होती. त्याचप्रमाणे आता देशासाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी सगळे पक्ष एकत्र आले आहेत असे ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे समाजवादी यांच्यासोबत गेले. मुसलमान यांच्यासोबत गेले अशी टीका होईल. पण मला त्याची पर्वा नाही. शिवसेनेचे हिंदुत्व कसे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यांच्या विचारांशी आम्ही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी क्रिकेटरवर फुलांचा वर्षाव भाजपा करू शकत असेल आणि मी शिवसेना म्हणून बोलू शकत नाही? का बोलायचं नाही? आम्ही बोललो तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय? असा थेट सवाल ठाकरे यांनी केला.
मी जसा आहे तसा आहे स्वीकारा अथवा नाकारा. २१ पेक्षा जास्त पक्ष एका माझ्यासोबत आले हे माझे भाग्य आहे. माझ्याकडे आज काहीच नाही तरी तुम्ही सोबत आलात. कारण लढाई ही विचारांशी असते, व्यक्तींशी नाही. त्यामुळे आपल्याला विचारांचा लढा पुढे न्यायचा आहे. आजही मला लाडके माजी मुख्यमंत्री म्हणतात. कुटुंबप्रमुख असल्याचा आनंद वाटतो. समाजवादी काय देशाबाहेरुन आलेत का? आमचे मतभेद गाडून आम्ही सोबत आलो आहोत. तुम्हाला काय करायचंय? देशावर प्रेम करणारे मुस्लिम सोबत आले तर पोटात दुखण्याचं कारण काय? अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
नेते काही करायचं असतं ते करत असतात. पण, कार्यकर्ता खरा महत्त्वाचा. माझ्या शिवसेनेत मी पक्षप्रमुख आहे. परंतु, माझ्या दृष्टीने महत्त्वाचं पद असेल तर ते आमचा गटप्रमुख. दहीहंडीत वरची हंडी फोडताना थरावर थर लागत जातात. तसे पदाधिकारी असतात. खालचा थर बाजूला झाला तर? माझ्यावर चार थर लागताहेत. ओझा आहे आणि हा वर चढणार असे कार्यकर्ता म्हणाला. बाजूला झाला तर थर टिकेल का?
कार्यकर्ता ही साखळी आहे. जिद्द असते तेव्हा तशी हंडी फोडण्याची ताकदी आपल्यात आहे का? याचा विचार करावा लागतो. त्यातील काही जण फक्त दही खाण्यासाठी असतात. पण जे दही चोरणारी लोक आहेत आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत 25, 30 वर्ष एकत्र होतो, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.