उद्धव ठाकरे आता रस्त्यावर उतरणार, शिंदे सरकार विरोधात पहिला एल्गार, मुंबई महापालिकेवर ‘महा’मोर्चा
महापालिकेचा पैसा वापरला जातोय. आतापर्यंत सात ते नऊ हजार कोटी वापरण्यात आले आहेत. हा जनतेचा पैसा आहे. जनतेच्या पैशाची लूट, त्याचा हिशोब जनतेला द्यावाच लागेल. त्या हिशोबाचा जाब विचारण्यासाठी शिवसेना मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे.
मुंबई : राज्यातील महापालिकांच्या निवडणूका पावसाप्रमाणे लांबत चालल्या आहेत. जाब विचारणारे कुणी नाही अशाप्रकारे शिंदे सरकारचा उधळपट्टी कारभार सुरु आहे. वारेमाप पैसा उधळला जातोय. G – 20 च्या नावाने लुटालूट सुरु आहे. कोणतेही काम असले तरी बेधडकपणाने महापालिकेचा पैसा वापरला जातोय. माझ्या कानावर असं आलं की आतापर्यंत जवळपास सात ते नऊ हजार कोटी वापरण्यात आले आहेत. हा जनतेचा पैसा आहे आणि या जनतेच्या पैशाची लूट, त्याचा हिशोब जनतेला द्यावाच लागेल. त्या हिशोबाचा जाब विचारण्यासाठी शिवसेना मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
लोकप्रतिनिधी नाहीत, लोकांची सेवा कशी करायची ?
दादर येथील शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई महापालिकेच्या पैशांची सध्या लुटालुट चालू आहे. महापालिकेची निवडणूक न झाल्यामुळे येथे लोकप्रतिनिधी नाहीत. त्यामुळे लोकांची कामे लोकांची सेवा करायची कशी? हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. ज्या वेळेला महापालिकेमध्ये जनतेचे प्रतिनिधी असतात तेव्हा तिथे प्रशासन प्रस्ताव पाठवत असतात. प्रतिनिधी असतात त्यांच्यासोबत त्याच्यावर चर्चा होते. मंजुरी, नामंजूर मिळते आणि नंतर प्रस्ताव मार्गी लागतात.
मुंबईकरांच्या पैशांची लुटालुट
परंतु, आता रस्त्याच्या नावाने असेल किंवा आणखीन कशाच्या नावाने असेल मुंबईकरांच्या पैशांची लुटालुट चालू आहे. मुंबईला कोणी मायबाप राहिला नाही. एक काळ असा होता की मुंबई महापालिका तुटीमध्ये होती. त्याच्यानंतर शिवसेनेकडे सत्ता आली. तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास 90 हजार कोटींच्या ठेवीपर्यंत महापालिकेची तिजोरी आमच्या कारभाराने म्हणा किंवा आमच्या सहकार्याने म्हणा त्याच्यात भर पडली.
मुंबईकरांचे हे पैसे जनतेच्या उपयोगाच्या कामांसाठी वापरण्यात येणार आहेत. पण, आता मात्र कोणतेही काम असले तरी बेधडकपणाने महापालिकेचा पैसा वापरला जातोय. आतापर्यंत जवळपास सात ते नऊ हजार कोटी वापरण्यात आले आहेत.
1 जुलै रोजी महापालिकेवर मोर्चा
हा जनतेचा पैसा आणि या जनतेच्या पैशाची लूट त्याचा हिशोब हा जनतेला त्यांना द्यावाच लागेल. त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना विराट मोर्चा काढणार आहे. महापालिकेतल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा काढणार असून या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते करतील. आदित्य करेल. येत्या 1 जुलै रोजी हा मोर्चा काढण्यात येईल अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.