‘शेतकऱ्यांच्या मुलांनी फक्त ही ट्रिक वापरली तर…’, नितीन गडकरी यांनी काय दिला असा सल्ला
काँग्रेसने निती बदलण्या ऐवजी जातीयवाद व सांप्रदायिकत्वाचे विष कालवले. मागच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला की संविधान बदलणार आहे. पण संविधान कोणी बदलू शकत नाही. कोणाची इच्छा असली तरी ते बदलता येणार नाही. आम्ही ते बदलू देणार नाही, असे गडकरी यांनी म्हटले.
देशात पेट्रोलची कमतरता वाढणार आहे. परंतु पेट्रोलला पर्याय इथेनॉल ठरणार आहे. यामुळे आता इंडियन ऑइल कंपनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये इथेनॉलचे 400 पंप सुरू करणार आहे. तसेच आता पाच कंपन्या इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आणणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी जर इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या वापरल्या तर उसापासून बनणाऱ्या इथेनॉलचा वापर वाढणार आहे. तसेच सध्या मक्याला जो भाव मिळत आहे, त्याचेही कारण इथेनॉल आहे, असे केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे इथेनॉलच्या गाड्या वापल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यातील प्रचार सभेत बोलताना नितीन गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांचे कल्याण कसे होईल? युवकांना रोजगार कसा मिळेल? स्मार्ट शहराबरोबर स्मार्ट व्हिलेज कशी तयार होतील? आपली शेती, उद्योगाची प्रगती कशी होईल? त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. त्यातील 60 वर्षे काँग्रेसला राज्य करण्याची संधी मिळाली. ग्रामपंचायत, नगरपालिका, विधानसभा जिल्हा परिषद, महापालिका सर्वच ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला, पण दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर यांची गरिबी दूर झाली नाही.
काँग्रेसमुळेच देशाचे नुकसान
मला पंडित नेहरू यांच्यावर टीका करायची नाही, पण काँग्रेसचे आर्थिक धोरण चुकीचे होते, असे नितीन गडकरी यांनी म्हटले. ते म्हणाले, रशियाचे आर्थिक मॉडेल होते तेच काँग्रेसने स्वीकारले. त्याचा फटका देशाला बसला. चुकीच्या आर्थिक नियोजनामुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. योग्य नेतृत्व आणि योग्य पक्ष असेल तर परिस्थिती बदलू शकते.
संविधान कोणीच बदलू शकत नाही…
काँग्रेसने निती बदलण्या ऐवजी जातीयवाद व सांप्रदायिकत्वाचे विष कालवले. मागच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला की संविधान बदलणार आहे. पण संविधान कोणी बदलू शकत नाही. कोणाची इच्छा असली तरी ते बदलता येणार नाही. आम्ही ते बदलू देणार नाही, असे गडकरी यांनी म्हटले.
मी पन्नास लाख कोटींची कामे केली. पण कोणी ठेकेदाराला माझ्या घरी येण्याची गरज पडली नाही. आज परिस्थिती अशी आहे, काम झाले नाही तरी चालेल पण मला विचारल्या शिवाय करू नका, असे म्हटले जाते. आज आपल्या देशाचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी योग्य नीती आणि नेतृत्व असलेल्या पक्षाची गरज आहे. ही सर्व परिस्थिती बदलू शकते. हे बदलने आपल्या हातात आहे.