शरद पवारांचे आमदार उत्तम जानकर यांचे स्फोटक दावे, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, जवळपास १५० मतदारसंघात गडबड झाली असून, अजित पवार यांचा बारामतीतील पराभव हा या गडबडीचाच भाग आहे. त्यांनी ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा आरोप केला आहे आणि महायुतीला खऱ्या अर्थाने १०७ जागा मिळाल्या असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत स्फोटक दावे केले आहेत. त्यांच्या या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर एक्झिट पोलचे जे अंदाज आले होते त्यामध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव होईल, असं कुठेही म्हटलेलं नव्हतं. अनेक संस्थांच्या सर्व्हेमध्ये तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काँटे की टक्कर असेल, असं म्हटलं होतं. पण निकाल त्यापेक्षा फार वेगळे लागले. या निकालात महाविकास आघाडी तर अक्षरश: भुईसपाट झालेली बघायला मिळाली. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांना 50 आकडाही गाठता आला नाही. तर महायुतीला 230 पेक्षाही जास्त जागांवर विजय मिळाला. या निकालानंतर आता राज्यात सरकारही स्थापन झालं आहे. नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपही झालं आहे. तसेच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनही पार पडलं आहे. यानंतर आता शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी निकालाबाबत खळबळजनक दावे केले आहेत.
विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघांमध्ये गडबड झालेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत 20 हजार मतांनी पराभूत झाले आहेत. तर महायुतीला फक्त 107 जागा मिळाल्या आहेत. ईव्हीएम कंट्रोस बॉक्समध्ये गडबड झाली आहे. पण तांत्रिकदृष्ट्या ते लक्षात येत नाही, असं उत्तम जानकर यांचं म्हणणं आहे. पण जानकरांनी आकडेवारीतूनच गणित मांडत खळबळजनक दावा केला आहे.
उत्तम जानकर नेमकं काय म्हणाले?
“या सरकारने जी निवडणूक घेतली आहे त्यामध्ये दीडशे जागांर ह्यांनी गडबड केली आहे. ह्यांचे मतदारसंघ किती आले आहेत, याची माहिती काढल्यानंतर अजित दादा देखील 20 हजार मतांनी पराभूत झाल्याची माहिती मिळत आहे. अजित दादांनी 1 लाख 80 हजार मते पडली आहेत, वनथर्ड म्हणजे तिनाशी एक असं प्रोपोशन इथे लावलेलं होतं. त्यामुळे युगेंद्र पवार यांची मते 80 हजार अधिक 60 हजार अशी 1 लाख 60 हजार मते आहेत. अजित दादा यांचे 1 लाख 80 हजारमधील 60 हजार मायनस होतात आणि त्यांना 1 लाख 20 हजार अशी मते राहतात”, असा मोठा दावा उत्तम जानकर यांनी केला.
“अजित दादा यांचे फक्त 12 आमदार निवडून आले आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे फक्त 18 आमदार निवडून आले आहेत. तर भाजपचे 77 आमदार निवडून आले आहेत. अशी त्यांची सर्व मिळून 107 आणि अपक्ष मिळून 110 अशी त्यांची संख्या आहे. मी प्रत्येक मतदारसंघाचा सखोलपणाने अभ्यास केला आहे”, असं उत्तम जानकर म्हणाले.