Valentine’s special | नाशिकमधल्या नळकस गावातली अतूट प्रेम कहाणी अन् नल – दमयंतीचे मंदिर…!
नळ आणि दमयंतीच यांच्या प्रेमाचा कस या ठिकाणी लागला. त्यामुळे या गावाचे नाव 'नळकस' पडले. येथील ग्रामस्थही नल - दमयंतीच्या प्रेमात पडले. ग्रामस्थांनी स्वयं निधीतून 'नल- दमयंती' नावाने मंगल कार्यालय उभारले.
नाशिकः जगभरात आज 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) साजरा केला जातोय. प्रेमिक या दिवशी आयुष्याभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतात. कोणी कुणाला प्रपोज करते. यात कोणाचे प्रेम सफल होते, तर कोणाचे प्रेम असफल. नाशिकचे (Nashik) कवीवर्य कुसुमाग्रज (Kusumagraja) आपल्या कवितेत म्हणतात, प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं…प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं…प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं…मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं…असं प्रेम सध्या कुठे दिसते की नाही याची कल्पना नाही. मात्र, अशीच प्रेम कहाणी नाशिक जिल्ह्याल्या सटाणा तालुक्यातल्या नळकस या लहानकशा गावात फुलली, बहरली. त्यामुळेच येथे या प्रेम कहाणीचे स्मारक म्हणून एक नल – दमयंतीचे मंदिर बांधण्यात आले. नेमकी काय आहे ही प्रेम कहाणी?
का उभारले मंदिर?
नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातील नळकस. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रेम आणि त्यागाचे प्रतीक असलेल्या नल – दमयंतीचे मंदिर पाहायला मिळते. राज्यात नळदुर्गनंतर येथेच नल आणि दमयंतीचे मंदिर आहे. या मंदिरात ग्रामस्थ मनोभावे त्यांची आराधना करतात. विदर्भाचा राजा असलेल्या नल व दमयंती यांनी एकमेकांना न पाहता स्वच्छ मनाने एकमेकांवर प्रेम केले. दमयंती राणीने स्वयंवरातही नल राजाला बरोबर ओळखून स्वयंवर केले. मात्र, नंतर पुढे छळ कपटाने नल राजाचे राज्य गेले. अशा बिकट परिस्थितीतही दमयंतीने नलाची साथ सोडली नाही. त्या काळात नाशिक दंडक अरण्यात असताना त्यांची ताटातूट झाली. पुन्हा त्यांची ‘नळकस’ येथे त्यांची भेट झाली. ते परिसराच्या प्रेमात पडले. काही काळ त्यांनी येथेच वास्तव केले. त्यांच्या वास्तव्याचा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांचे मंदिर उभारले आहे.
‘नळकस’ नाव कसे पडले?
नळ आणि दमयंतीच यांच्या प्रेमाचा कस या ठिकाणी लागला. त्यामुळे या गावाचे नाव ‘नळकस’ पडले. येथील ग्रामस्थही नल – दमयंतीच्या प्रेमात पडले. ग्रामस्थांनी स्वयं निधीतून ‘नल- दमयंती’ नावाने मंगल कार्यालय उभारले. हे मंगलकार्यालयही नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात येते. नवी लग्न झालेली जोडपी सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका घेतात. गावकरी मनोभावे त्यांना पूजतात. महाशिवरात्रीला येथे नल – दमयंतीच्या नावाने यात्रा भरते. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. आज जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातोय. आपल्या प्रिय व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. प्रेमाचे प्रतीक असलेल्या नल – दमयंतीचे मंदिर जतन करून नळकस वासीयांनी अनोखे व्हॅलेंटाईन जपले आहे.
इतर बातम्याः