वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाचा वाद चिघळला, संभाजी ब्रिगेडची वादात उडी, थेट दिला इशारा
Waghya Dog Controversy: संभाजी भिडे वाघ्या कुत्र्याला ऐतिहासिक संदर्भ असल्याचा पुरावा देत आहेत. पण त्यांचा पुरावाही आम्हाला मान्य नाही. त्यांनी आमच्या सोबत चर्चेला यावे, असे आव्हान आम्ही संभाजी भिडे यांना देत आहोत.

Waghya Dog Controversy: राज्यात पुन्हा एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी दोन दिवसांपूर्वी रायगडवर असलेल्या वाघ्या कुत्र्याची शिल्प काढून घ्यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर संभाजी भिडे यांनी बुधवारी वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्यास विरोध केला होता. गुरुवारी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कुटुंबातील वशंज भूषणसिंह राजे होळकर यांनी त्याला विरोध केला. आता या वादात संभाजी ब्रिगेडने उडी घेतली आहे. एक मेपर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा, असा अल्टिमेटम संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला दिला आहे.
संभाजी ब्रिगेडकडून अल्टीमेटम
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाचा वाद चांगलाच चिघळत आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्यानंतर आता संभाजी ब्रिगेडने या वादात उडी घेतली. एक मेपर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा, असे अल्टिमेटम संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला दिले आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर म्हणाले, राज्य सरकारने एक मे पर्यंत दिलेले अल्टिमेटम पाळले नाही तर एक मे नंतर संभाजी ब्रिगेड पुन्हा एकदा रायगडावरील वाघ्या पुतळा हटवणार आहे.
सौरभ खेडेकर म्हणाले, छत्रपती संभाजी राजे यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. संभाजी राजे यांच्या भूमिकेला राज्य सरकार काय प्रतिसाद देते, त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मराठा जोडो यात्रा संपल्यानंतर एक मेला आम्ही स्वतः पुतळा काढणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला.




संभाजी भिडे यांना आव्हान
सौरभ खेडेकर यांनी संभाजी भिडे यांनाही उत्तर दिले. ते म्हणाले, संभाजी भिडे वाघ्या कुत्र्याला ऐतिहासिक संदर्भ असल्याचा पुरावा देत आहेत. पण त्यांचा पुरावाही आम्हाला मान्य नाही. त्यांनी आमच्या सोबत चर्चेला यावे, असे आव्हान आम्ही संभाजी भिडे यांना देत आहोत.
असा आहे तो वाद
वाघ्या या पाळीव कुत्र्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समाधीत उडी घेतली असल्याचे म्हटले जाते. मात्र, यावर इतिहास तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नाही. काही जण ही दंतकथा असल्याले म्हणतात. या वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी 1906 मध्ये इंदूरचे राजे तुकोजी होळकर यांनी देणगी दिली होती. त्यातून ही समाधी बांधली गेली होती. यापूर्वी 2011 मध्ये संभाजी ब्रिगेडने हा पुतळा हटवला होता. त्यानंतर धनगर समाजाच्या भूमिकेनंतर तो परत आणून बसवला.