Wardha Flood : पुराने अडवली वाट पण गावकऱ्यांनी जीव धोक्यात घालून दिली साथ, वर्ध्यात छातीभर पाण्यातून रुग्णास पाठविले रुग्णालयात
चानकी येथील संतोषरावांची प्रकृती बिघडली. गावकऱ्यांनी त्यांना खाटेवर मांडले. चिखलातून तसेच पुरातून मार्ग काढला. नाल्याच्या पलीकडं नेलं. त्यानंतर सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केलं. त्यामुळं रुग्णाचे प्राण वाचले.
वर्धेत पावसाने चांगलाच कहर केला असून नदी, नाले ओसंडून वाहत आहे. अश्यातच हिंगणघाट (Hinganghat) तालुक्याच्या चानकी येथे नदीला पूर आल्याने एक रुग्ण गावात अडकला. मात्र गावाकऱ्यांच्या साथीने दुसऱ्या मार्गांवरील नाला पार करून त्याला रुग्णालयात पाठवले. नाल्याला छातीभर असलेल्या पाण्यातून वाट काढत समस्त गावकऱ्यांनी खाटीच्या सहाय्याने रुग्णाला ऋग्नवाहिकेजवळ नेले आणि सर्वांचा जीवात जीव आला. चानकी येथील 50 वर्षीय संतोषराव पाटील (Santoshrao Patil) यांची मागील पाच दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ होती. मंगळवारी त्याला अल्लीपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. डॉक्टरांनी ( Doctor) औषधोपचार करून त्याला घरी पाठवले. दरम्यान रात्री झालेल्या पावसात यशोदा नदीला पूर आल्याने चानकी भगवा हा मार्ग बंद झाला. अश्यातच रुग्णाची प्रकृती खालावली. पुढं नदीला पूर आल्याने रस्ता बंद आणी मागं दुसऱ्या बाजूला नाल्याला छातीपर्यंत पूर. अशा बिकट स्थितीत गावकऱ्यांनी त्याला गावातील नाल्याच्या पुरातून मार्ग काढण्याचा विचार केला.
पुरातून काढली गावकऱ्यांनी वाट
गावकऱ्यांनी एकत्र येत शेतकऱ्याच्या घरी असलेल्या बैल बंडीच्या सहाय्याने त्याला नाल्यापर्यंत आणलं. पुढे खाटीच्या मदतीने छातीभर पाण्यातून वाट काढून दिली. चानकी भगवा रस्ता बंद असल्याने गावकऱ्यांनी रुग्णाला चानकी येथून सलामनगरला जोडणाऱ्या नाल्याला पार करण्याचा निर्धार करत त्याला रुग्णालयात पाठविले. नागरिकांच्या मदतीने रुग्णाला पुरातून वाट काढून देत सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. सध्या रुग्णावार सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहे.
रुग्णाला खाटेवर मांडून नाला केला पार
विदर्भात सर्वत्र पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. नदी, नाल्यांना ठिकठिकाणी पूर आला. अशावेळी रुग्णास एका गावातून दुसऱ्या गावात रुग्णालयात कसे नेणार, यावर गावकऱ्यांनी उपाय शोधून काढला. चानकी येथील संतोषरावांची प्रकृती बिघडली. गावकऱ्यांनी त्यांना खाटेवर मांडले. चिखलातून तसेच पुरातून मार्ग काढला. नाल्याच्या पलीकडं नेलं. त्यानंतर सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केलं. त्यामुळं रुग्णाचे प्राण वाचले.