Wardha : बापरे! विजेअभावी तब्बल 1 हजार 970 कोंबड्या तडफडून मेल्या, शेतकरी हवालदिल
Wardha Farmer News : स्वतःच्या शेतीला जोडधंदा म्ह्णून बँक ऑफ इंडिया येथून 15 लाखांचा कर्ज काढत व्यवसाय सुरु केला.
वर्धा : वर्धा (Wardha News) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. विजेअभावी जवळपास दोन हजार कोंबड्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. पाच तास विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे कोंबड्यांचे हाल झाले. विजेअभावी तापमान वाढत गेलं आणि कोंबड्यांचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना वर्धा जिल्ह्यातल्या देवळी तालुक्यात घडली. या घटनेनं शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवलंय. वीज वितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा (Wardha Electricity) खंडीत करण्यात आल्यानं ही दुर्दैवी घटना घडली. सागर पजगाडे (Sagar Pajgade) यांनी सुरु केलेल्या कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्याचा जीव गेल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालंय. या प्रकरणी पोलिसांमध्येही तक्रार दाखल करणयात आली आहे. तसंच स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत घटनास्थळाची पाहणी केलीय.
कर्ज काढून सुरु केला होता व्यवसाय
वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील मलातपूर मलातपूर येथे सागर पजगाडे यांचे आठ हजार पक्ष्याची क्षमता असलेले कुक्कुटपालन केंद्र आहे. स्वतःच्या शेतीला जोडधंदा म्ह्णून बँक ऑफ इंडिया येथून 15 लाखांचा कर्ज काढत व्यवसाय सुरु केला. त्याचा व्यवसाय जोमात असताना वीज वितरण कंपनीकडून परिसरातील विजपूरवठा महावितरणणे कामासाठी खंडीत केला.
तब्बल पाच तास खंडित असलेल्या विजपूरवठामुळे पोल्ट्री फॉर्म मधील तापमानात वाढ झाली. पोल्ट्री फॉर्मचे तापमान नियंत्रित ठेवण्याकरिता शेतकऱ्याने शेडमध्ये तीन एक्झॉस्ट फॅन आणि दोन मोठे कुलर लावले होते. सोबतच वेळोवेळी पाण्याचा मारा करून तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी यंत्रणा उभी केली होती. मात्र विद्युत पुरवठा बंद असल्याने हे सर्व बंद होते. यामुळे शेतकऱ्याच्या 1 हजार 970 कोंबड्या दगावल्यात.
पाहा व्हिडीओ :
नुकसान भरपाईचं काय?
शेतकऱ्याने या प्रकरणी देवळी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. उष्माघातने या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जातं आहे. आता झालेलं नुकसान कसं भरुन काढायचं, असा प्रश्न शेतकऱ्याला सतावू लागलाय.