Washim | बंजारा समाज ठाकरे सरकारवर नाराज, 23 एप्रिलला बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर जाणार, मूक आंदोलन करणार
पूजा राठोड आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे बंजारा समाजाचा कुणीही प्रतिनिधी मंत्रिमंडळात राहिला नाही. यामुळे समाजावर अन्याय होत आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
वाशिम : माजी वनमंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी बंजारा समाज आता आक्रमक झालाय. बंजारा समाजाच्या धर्मगुरूंची एक बैठक नुकतीच पोहरादेवी ( Pohardevi) येथे पार पडली. यामध्ये त्यांनी ही मागणी केलीय. शिवाय फडणवीस सरकारच्या काळात पोहरदेवीच्या विकासासाठी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळं बंजारा समाज ठाकरे सरकारवर नाराज आहे. 23 एप्रिलला हजारो बंजारा बांधव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाणार आहेत. तिथे बंजारा रीतीरिवाजाप्रमाणे भोग चढवून मूक आंदोलन करणार अशी माहिती पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज (Sunil Maharaj) यांनी माहिती दिली आहे. पूजा राठोड आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे बंजारा समाजाचा कुणीही प्रतिनिधी मंत्रिमंडळात राहिला नाही. यामुळे समाजावर अन्याय होत आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
संजय राठोड यांना मंत्रिपदावर घेण्याची मागणी
संजय राठोड यांच्या मंत्रिपदाच्याच्या काळात पोहरादेवीच्या विकासासाठी मंजूर केलेला निधी तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे. पूजा चव्हाण प्रकरणानंतर शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या चौकशीत त्यांच्यावर कोणताच आरोप सिद्ध झाला नाही. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आरोप सिद्ध होऊनही मंत्रिपदाचे राजीनामे घेतले नाही. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद द्यावे अन्यथा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी आंदोलन करणार असल्याचे पोहरादेवी येथील महंत यांनी काल बैठक घेऊन सांगितलं. तसंच राज्यभरातील बंजारा समाज आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे सांगण्यात आलंय.